* पत्र *
*शिक्षकदिनी गुरुप्रति ; विद्यार्थ्याची कृतज्ञता*
संत तेरेजा विद्यालयातील सर्व गुरूवर्यांसी, सविनय प्रणाम. आपणाला असं पत्र लिहिणं; त्याद्वारा आपणाकडून मिळविलेल्या अफेड ज्ञानदाना प्रति नतमस्तक होणं माझं मलाच सुखावून जात आहे. आपल्या सहवासात येताना प्रारंभीच निराकारी असणाऱ्या बालमनाला आपण आकारी बनवलत. कारणी लागण्यायोग्य पात्रतेची सामर्थ्यशील शिदोरी आपण मला दिलीत. त्यायोगे मिळालेली निःसंदेही वाटचालीची प्रेरणा क्षण नि क्षण मला आयुष्याचं शिक्षण देत आहे .कालौघात लुप्त झालेल्या आपल्या सहवासाची उणीवही ती नेहमीच भरून काढत आहे.
विद्यार्थी बनून आपल्या विद्यादातृत्वी छत्राखाली राहण्याच्या सुखद अनुभवाची आज समाप्ती झाली आहे.तरीही आयुष्याच्या बेतौल पथक्रमणात सावरण्याचे शिक्षण देणारे, सभोवतालातून तसं शिकण्याची जाणीव निर्माण करणारे आपले आशीर्वाद परम हितैषी बनून माझ्या अंतर्यामी स्थित आहे.
शिक्षणक्रमातल्या दहाव्या इयत्तेच्या अखेरीस आपणाकडून मी निरोप घेतला. विद्यालयीन सहवासाच्या त्या अखेरच्या पर्वात आपल्याच बळाधाराने मिळविलेल्या यशाप्रित्यर्थ आपण मला कौतुकमाला घातल्या. माझ्या वडिलांचा सत्कार केलात. त्या क्षणापर्यंतही मी अहंमविकारीच होतो. कृतज्ञता भाविकतेच्या पातळीवरील, माझी तत्कालीन निर्भाव मनस्कता ; आज मला सारखी वेदना देत आहे.
आपल्या आशिषवर्षावात फुलारणाऱ्या माझ्या आयुष्याला खरतर मीच कृतज्ञतायुक्त जाणीवेचे अधिष्ठान द्यावयास पाहिजे होते. पण मी मात्र खुशाल घेण्याचाच क्रम चालू ठेवत होतो. सर्जनशील संवेदनांना केवळ स्वार्थलोलूपतेतच अडकवू पाहत होतो. माझे मागणीपात्र कसे भरत आहे? कोण भरत आहे? यांसारख्या कार्यकारणभावाचा शोध करणे मला जमलेच नाही. सर , बाई आपणही किती थोर ! मी मिळविलेल्या आपल्या देयदानाचे मोल मला त्यावेळी भासू देखील दिले नाही. तसे मोल आपण केलेही नाही. उलट सारखे भरभरून देत राहिले. माझ्या अज्ञानजन्य निर्भाव मनस्कतेला आपण आपल्या समंजस जाणिवेनं बालबोध समजलात. माता-पिता बनून मला आश्रय दिला. मला सांभाळले. म्हणूनच मी वाढलो. आयुष्यात उभा राहिलो. जीवनातल्या अडीअडचणींना समर्थपणे सामोरे जाण्यास शिकलो. अक्षरांना वळण देणारी मी भविष्याला सुखकारक बनविणारी लेखणीची पकड आपल्या हातांनीच माझ्या हातांना शिकविली.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आब्राहम लिंकन यांनी विद्यार्थीहितार्थ आपणाला पत्र लिहिले. विद्यार्थी पितृत्वाची बांधिलकी बाळगणारे या नात्याने या थोर विभूतीचा 'धर्माचा पुत्र' असे स्वतःस म्हणवून घेण्यास मला सार्थ संतोष वाटतो. त्यांनी केलेल्या पत्ररुपी सूचना संदेशाचे पालन कृत्रिमतेने करण्याची कसरत आपल्याला कधी पडलीच नाही. मूलत:च तो अमूर्त वारसा आपण मिळविलेला आणि विद्यार्थ्यांत रुजविलेला होता. असे बोलून मी मोठे धाडस करू पाहतोय असे आपणांस वाटेल. त्याच ओघात माझे बोलणे स्वयंप्रशंसकाच्या पारड्यात तोलले जाण्याचीही मला भीती वाटते. मी इतका मोठा नाही सुद्धा. ते सर्वच मी प्राप्त केले असेही मला म्हणायचे नाही. परंतु तरीही आपण ते सर्व मला आणि माझ्या सभोवतालच्या विद्यार्थ्यांना देण्याचा, गळी उतरविण्याचा प्रयत्न केला. मी कितपत मिळविले ,कारणी लावले यावर अथवा माझ्या पात्रता कौशल्यावर ते अवलंबून आहे. शेवटी मूर्ती घडविण्यासाठीही चांगल्या प्रतीच्या दगडाची आवश्यकता असतेच.छन्नी हातोड्याच्या एका भेदनातच जर त्याच्या ठिकर्या उडत असतील तर ते व्यर्थच ; असे त्यावेळी समजले जायचे. तात्पर्य असे की आमच्या साठीचे आपले प्रयत्न सर्वस्वीपणाचे होते. हे मनोगतं विनयपूर्वक सांगण्यासाठी मला या पातळीपर्यंत धाडस करण्याचा खटाटोप करावा लागला. मी याबद्दल आपली क्षमा मागतो.
बाई,तुम्ही आईचेच एक रूप होता. शाळा आणि घर या दोनच क्षेत्रांनी माझं सर्वाधिक बालविश्व त्यावेळी व्यापलेलं होतं. घरात आईच्या आणि शाळेत तुमच्या या दोनच रूपात मातृत्वीसंजीवनाची तहान भागविणारे झरे मला माझ्या बाल्यावस्थेत लाभले होते. केवळ त्याच वरदानावर आज मी माझ्या आत्मसुखासाठी विधायक ते ग्रहण करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यातून मिळणाऱ्या प्राप्तीत मला समाधानही मिळत आहे. अनेक दुविधात्मक प्रश्नांमधून इष्ट ती मार्गनिवड करण्यास आपण दिलेल्या शिक्षणाचे,आशीर्वादाचे बळ माझ्यासाठी पुरेसे ठरत आहे.झोकापंचमीच्या आधील दिवशी "झोका जपून खेळा. पडू नका .भान ठेवा." यासारख्या तुम्ही दिलेल्या अवधानसूचक सूचना अजूनही कर्णपटलावर हलकेच ऐकू येतात.त्यांचे पडसाद अगदी अंतःकरणीय संवेदनांशी जुळून जातात. आमच्यासाठीची तुम्ही बाळगलेली माया,ममता,करुणा, काळजी यांची जाणीव करून देतात. बाई, मन खरंच फार भरून आलं आहे. तेव्हा का बरं इतकी जाणीव झाली नसावी? बालपणाची मर्यादा इतकी व्यवहारी असते का? इयत्तांच्या पायऱ्या चढत-चढत मध्यंतरीचा किती काळ तुम्हाला विसरलो होतो.
बाई तुम्ही शिकविलेले पुस्तकांमधील सर्व धडे अजूनही बुद्धीत बिंबलेले आहेत. मात्र शिकवून संपलेल्या प्रत्येक धड्याची उलटली जाणारी पाने ; तुमच्या करुणाछायेचा सहवासी काळ दडवून ठेवत बंद झाली. या वास्तव व्यवहारी काळापर्यंत कसे स्थलांतर झाले हे कळले सुद्धा नाही.धड्यांची उलटून गेलेली ती पाने पुन्हा उघडता येतील का?
सर मला समजलं की शिक्षण हे विविध अभ्यासशाखांच्या अमर्याद अनुभवांच शास्त्र आहे. तपस्या ही त्यासाठी आलीच. आज शक्य तेवढं शिकण्याचा मी प्रयत्न करतोय. महाविद्यालयीन शिक्षण प्रवाहात मीसुद्धा सहभागी होत आहे. आपण शिकविलेले माझ्या पूर्वीचे... बरोबरीचे.. त्यानंतरचे कित्येक विद्यार्थी त्यात निपूण देखील बनले. अजूनही आपले तद्उद्देशी कर्तव्यक्रमण चालूच आहे. तुमचे विद्यार्थी शिक्षण प्राप्तीसाठी जे प्रयत्न करतात ; त्या प्रयत्नांना इतरजण कौतुकस्पदतेने तपस्या मानतात. तुमच्या विद्यार्थ्यांना मात्र ती 'तपस्या ' मुळीच वाटत नाही. हे श्रेय केवळ तुमचेच आहे. कारण आपणच या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण सुलभतेचं बनवलं. 'शिक्षण प्राप्ती म्हणजे आनंदानुभूती ; जिज्ञासापुर्ती 'अशी प्रेरणासूत्रे देऊन प्रयत्नसार्थकते साठीचे नवनवे मार्ग त्यांच्या दृष्टीस आणले.
सर माझ्या जीवनात आपला किती प्रभाव पडला म्हणून सांगू ! आज माझ्याजवळ जे काही आहे ; ते आपले आहे. आपणच ते माझ्यात भरले. मी ओतप्रोत भरावा यासाठीच आपले प्रयत्न चालत. बुद्धीचे भांडे घेऊनच आम्ही विद्यार्थी शाळेत येत होतो. ते शिक्षणाने, ज्ञानाने भरावे या जाणिवेने आपणाकडून ज्ञानस्रोत चालू होते. कुणी आपले भांडे भरून घेतले? किती भरले? कुणी ते त्या स्रोत धारेखाली धरले होते? यांसारख्या प्रश्नांच्या उत्तरात विद्यार्थ्यांची यशस्वीतता अवलंबून असते. नुकसानकारक अल्लडता कदापिही माझ्यात नव्हती ; असे मी मुळीच म्हणणार नाही. 'विद्यार्थीसुद्धा कुठे चुकू शकतो ?' याबाबत आलेल्या जाणिवेची कबुली द्यावी म्हणून हे सांगितले. अधूनमधून लागणार्या ठेचांनी हे सारं सारं आठवतं . त्यातून विद्यार्थ्यांनी पाळावयाच्या आवश्यक कर्तव्यांच स्वरूप समजतं.
सर, त्या वेळी आपण ' तहानलेल्या घोड्याचा ' जो दाखला द्यायचे. तो नेहमीच आठवणीत आहे. या घोड्यास केवळ पाण्याजवळ नेण्याचेच मालकाचे कर्तव्य असते. पाणी प्यायचे अथवा नाही हे त्या प्राण्याला ठरवावे लागते. विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या यांसारख्या दाखल्यांचे अर्थानुकूल गांभीर्य त्यांनी वेळीच समजून घेतले तर! त्यांना ते उमजले तर!
सर शाळेच्या बाहेर धकाधकीने आणि व्यवहाराने सर्वाधिक जीवन व्यापून गेलं आहे . अशा या जीवनात सुखस्थैर्याची , आत्मसुखाची आश्रयस्थाने मिळविण्यासाठी जीवघेणी स्पर्धा चालू आहे. माणसांची अनेक रूपं पाहण्याचा अनुभव नित्याचाच झाला आहे .आज हे सारं कळतय .कदाचित हे सारं 'काही'च्याच मात्रेत असेल. याशिवाय कळायच्या गोष्टी अजूनही बऱ्याच शिल्लक असतील. हे देखील मी गृहीत धरून आहे. शाळकरी बनून आपल्या कृपाछत्रात विसावताना या सर्व गोष्टींची धग मला लागली नाही. आपण ती लागू दिली नाही. मला सांभाळलं. माझं बालपण सांभाळलं.
शालेयजीवना सोबत आपला सहवासीकाळ संपायला नको होता; अशी इच्छा सतत मनात बाळगून मी आपणांस दुःखी करणार नाही. कर्तव्य पराङमुख होणार नाही. भावनेपेक्षा श्रेष्ठ असलेल्या कर्तव्याचा तुम्ही शिकवलेला धडा मी विसरणार नाही. बाहेरच्या जगात वावरण्यासाठी माझ्या पावलांना तुम्ही दिलेल्या उभारीच्या, चैतन्याच्या बळावर मी चालणार आहे.
तुमच्या आशीर्वादाचे
तुमच्या शिक्षणाचे
सत्यबळ अंतःकरणात घेऊन ;
या व्यवहारात
या धकाधकीत
मी चालणार आहे
अगदी निर्भय होऊन!
आपल्या आशीर्वादातला शिष्य
सुरेश दगडू भिंगारदिवे
राहाता,अहमदनगर