फॉलोअर

गुरुवार, ८ डिसेंबर, २०२२

सेवानिवृत्ती प्रित्यर्थचे सन्मानपत्र

 " तू शिक्षण दृढ धरून ठेव; सोडू नको; ते जवळ राख; कारण ते तुझे जीवन आहे. "

सन्माननीय,
मानवेल बाबुराव सोनवणे,
                ज्ञानाचे वर्णिलेले उपरोक्त लाभ आपल्या विद्यार्थ्यांना प्राप्त व्हावेत अशीच उदात्त ध्येयासक्ती प्रत्येक शिक्षकाच्या अंतर्यामी संस्कृतीने अपेक्षिलेली आहे.अशा सद्गुरु - संस्कारप्रभू , प्रत्यक्ष विद्यार्थीवर्गाच्या-परिप्रेक्ष्यात कार्यरत राहिलेल्या ; शिक्षणकर्मी तज्ज्ञांच्या मांदियाळीतील अध्वर्यू : कर्मवीर अण्णा यांनी  'रयत शिक्षण संस्थे'ची स्थापना केली. आशिया खंडातील सर्वात मोठ्या संस्थेचे मानक वैशिष्ट्य प्राप्त केलेल्या रयत परिवारातील  राहाता, गणेशनगर व श्रीरामपूर या शाखांमध्ये आपण अध्यापनाचे कार्य केलेत.
दि.२२ऑगस्ट१९८८ ते दि.३१ मे २०२१ पर्यंतच्या  सुमारे तेहतीस वर्षीय सेवा कालात  राष्ट्रप्रेमाचे धडे देणाऱ्या एन.सी.सी. विभागप्रमुख पदाची जबाबदारी देखील आपण पंचवीस वर्षे सक्षमपणे सांभाळली.
ज्ञानदानासोबतच वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन व ग्रामस्वच्छता अभियान आदिंसारख्या शासनप्रेरित विधायक सामाजिक उपक्रमात उल्लेखनीय सहभागही घेतला. शिस्तप्रिय पण मनमिळाऊ ; शांत व मितभाषी असा आपला स्वभाव असल्याने 'अजातशत्रू' म्हणून आपण ज्ञात आहात. मातृभाषा:मराठीचे अध्यापन  करत असताना सृजनानंद देणाऱ्या ललितकलादि संस्कारांचा प्रभावही आपण आपल्या विद्यार्थ्यांमध्ये जाणीवपूर्वक संस्कारित केलात. संस्थेच्या उच्च आदर्श मूल्यांना अनुसरून आपण अंगिकारलेली व विद्यार्थ्यांत प्रसृत केलेली निष्ठा,बांधिलकी संस्थेच्या भविष्यकालीन नावलौकिकात वाढ करण्यास निश्चितच पूरक ठरेल. आपल्या सेवापूर्ती प्रसंगा प्रित्यर्थ हे सन्मानपत्र आपणास प्रदान करताना म्हणूनच खूप आनंद होत आहे. भविष्यकालीन आरोग्यदायी संतृप्त वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
         रयत शिक्षण संस्थेचे
         डी डी काचोळे विद्यालय श्रीरामपूर,
         जिल्हा -अहमदनगर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

 सर्वांना सप्रेम नमस्कार🙏2015 सालातील हिरोशिमादिनी मित्र परिवारात साजऱ्या झालेल्या माझ्या वाढदिवशी माझ्यातल्या अभयी बालवृत्तीला पाहून माझ्य...