सामाजिक मनाचे कवाडं उघडून दाखवणारा काव्यसंग्रह
"कवितेच्या स्मरण ओळी" होय.
"कवितेच्या स्मरण ओळी" कवी सुरेश भिंगारदिवे.
कवी सुरेश भिंगारदिवे यांचा काव्यसंग्रह जवळजवळ आठ नऊ वर्षांनी हाती आला. एक अति संवेदनक्षम असलेला हा कवी शिक्षक म्हणून आपल्या कामात दक्ष आहे. साहित्याची जवळीक साधत साधत, आपल्या मनातल्या भावना त्यांनी काव्यातून स्पष्ट केल्या आहेत.
त्यांच्या कविता निसर्ग आणि सामाजिक उणीवांच्या जाणिवा करून देतात. हे करीत असताना ते स्वतः स्वतःशी एक संवाद साधतात. 'महानगरा' या आपल्या कवितेत सामाजिक विषमते विषयीच्या अगतिक प्रश्नांची सत्य कल्पना त्यांना अस्वस्थ करून जाते.
भूमीचं आकाशाशी जडलेलं नातं कसं कोसळून जातं, ही वेदना आपल्या मनाला
शून्यतेत नेते. कृती आणि युक्तीत असणारे भिन्न विचार एक जीव व्हावे, असं त्यांना वाटतं. ही तत्व नाळ जोडण्याचा ते प्रयत्न करतात. तर वागणं या कवितेत ते ईश्वराला साक्षी ठेवून केलेल्या आपल्या उन्नत कृतींचं स्मरण करून देतात.
स्तुती निंदा यात श्री संत तुकारामांच्या अभंगाचा बोध होतो. ते म्हणतात की, स्तुती आणि निंदा यांची द्विधा स्थिती नाकारून जीवन जगावं. कुणी निंदा कुणी वंदा यातूनच आपण आपला जीवन मार्ग स्वीकारावा, असं त्यांना वाटतं.
प्रकाशाची निर्भाव दृष्टी संगत, प्रकाशाची दुर्गती दिव्यत्वाचा साक्षात्कार देऊन जाते.
उद्याच्या आशावाद स्वीकारून ते अंत:करणातल्या दुःखाच्या चक्रव्युवाहात अडकल्याची तक्रार या विश्वाच्या निर्मात्याकडे करतात. घावावर घाव सुसून शांत मनानं स्वतःच चिंतन हसत हसत करणारा हा कवी मनस्वी दमलेला थकलेला वाटतो. हे त्यांचे एकाकी जीवन मनाला वेदना देऊन जातात. यातील त्यांचे अंदाज, माणसातलं खरं रूप दाखवतात. घरट्यातलं जग, नातं, हिरवी गर्दी, जुनी भूत, प्रवास, माणूस, उकल अशा छोट्या छोट्या कवितेतून ते जीवनात एक सत्य वाचकांपुढे मांडतात. माणसाचं अंतर जग, वेदना, क्षितिज, भिंगरी, सद्दामचा फास यातून ते जगाच्या घडामोडीचा विचार करायला लावतात .
नव्या युगाची साथ ऐकून जीवनाच्या वाटेवर श्रम शक्तीशी नातं हा कवी केव्हा जोडतो हे कळत नाही. हे विशेष वाटतं. साहेब, आभाळमाया, आई या कवितेतून त्यांनी माणुसकी हरवलेला सामाजिक प्रश्न उभा केल्याची जाणीव देतो. आई बापासाठी मरणारा श्रावण बाळ , आणि बाळासाठी तडफडणारी आई बापाची माया, हृदयात कालवा कालव करते. त्यातून आजची सामाजिक स्थिती डोळ्यापुढे उभी राहते.
जग किती आणि कस बदललं तरी श्रावणात तू खरा भाग्यवान ठरला. हे सत्य आपण नाकारू शकत नाही. काव्यसंग्रहाचा शेवट शेतकऱ्यांच्या जीवनातल्या कवितेने करताना, अंतरीचं शिवार खुल्याची सत्यता पटते. श्रमजीवनात मानवी जीवन किती महत्त्वाचा आहे, हे ते सांगून जातात. एकंदरीत या कवितेच्या स्मरण ओळी जरी छोट्या मोठ्या स्वरूपातून जाणवतात, तरी त्या छोट्यातून मोठ्यांच्या समस्या असल्याचे प्रतिपादन होतं. त्यांच्या कविता ह्या जीवनाचे एक अंग स्पष्ट करून जातात, आणि ते म्हणजे समाजात किती तरी सामाजिक विषमता असल्याची जाणीव होते. अजून त्यांच्या मनात खूप काही सांगायचं आहे. हे सुद्धा जाणवतं. त्यांच्या विचारांना आणि लेखणीला शुभेच्छा देऊन, त्यांच्या या पहिल्या काव्यसंग्रहाचं सुयश चिंतितो.
धन्यवाद!
त्यांच्या हातून असंच वैचारिक मानवी मूल्यांचे दर्शन घडावं, यासाठी त्यांना भरभरून आशीर्वाद !
आपला ,
पुंडलिक गवंडी ,
ज्येष्ठ साहित्यिक , अकोले.
दिनांक 25 / 11 / 2022
मो. 92 72 13 59 11 .