फॉलोअर

शुक्रवार, २९ मार्च, २०२४

माझे पालक: साळवी साहेब

 

आजपासून मागील बत्तीस तेहतीस वर्षांपूर्वीच्या ; मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादेत मी माझं अननुभवी नि संकुचित अस्तित्वाच हरवलेपण घेऊन आलो होतो. शासकीय वसतीगृहातील प्रारंभिक प्रवेशार्थी यादीत नसल्याने सुरवातीचा मुक्काम कॉलेजच्या वसतीगृहात होता. तिथेही खोली न मिळाल्याने परिस्थितीचे भांडवल करत  कॉमनहॉल मध्ये राहण्याची सवलत मिळवली. तिथेही पहिल्याच दिवशी अंगावरचा बिछाना गायब झाल्याचे निमित्त मिळाल्याने घरी निघून आलो. हायस्कूलच्या बोर्डींगमधून असा न विचारता घरी गेलला विद्यार्थी पळकुटा ठरतो. पण दहावीनंतर कॉलेजला आलेल्या विद्यार्थ्यांचे प्रौढपण त्या-त्या स्थानिक संस्थेने गृहीत धरलेले असल्याने माझ्या पाठलागाचा प्रयत्न वा सुरक्षित असल्याबाबतची खात्री ट्रेनिंग कॉलेज वा त्याच्याशी निगडीत वसतीगृहाने करण्याचे कारण नव्हते.

         घरी गेल्यानंतर चार दोन दिवस राहिल्यानंतर लोकनिंदा अथवा पुढील भविष्याच्या काळजीने कुटुंबियांनी पुन्हा मला औरंगाबादला जाण्यास भाग पाडणे साहजिकच होते.

         कॉमन हॉलमध्ये राहून कॉलेजजमध्ये जाणे, वर्गात बसणे माझ्यादृष्टीने कठीण होते. ती माझीच नकारात्मकता होती. माझ्या सारखीच परिस्थिती असलेल्या पुष्कळ विद्यार्थ्यांनी खंबीरपणाने स्वतःला सावरून घेत शिक्षणाचा यज्ञ चालू ठेवला होता. मला मात्र ते जमत नव्हते. तशी आणि तेवढी क्षमता माझ्यात नव्हती. रडून रडून हवी असलेली गोष्ट मिळवण्याचा पोरकट बाल अट्टाहास इंथही प्रभाकर साळवी भाऊसाहेबांकडे केला. पूर्वीचा कोणताही संबंध नसताना या देवमाणसानं मला धीर दिला. जयसिंगपुरा येथील शासकीय वसतीगृहात नियमाच्या बाहेर जाऊन माझं तात्पुरतं पुनर्वसन त्यांनी केलं. सिडको वसाहतीपासून इथपर्यंत खूप लांबच्या अंतरा पर्यंत स्वतःच्या मोटारसायकलवर त्यांनी मला आणून सोडले. वसतीगृहाचे अधिक्षक आदरणीय खिल्लारे सर यांचे वसतीगृहात माझ्या आश्रयाची व्यवस्था केली.माझ्यासाठी त्यांना तिथे विनंती करावी लागली.

पुढील यादीत नाव येईल असा आशावाद देत कॉलेजला मी नियमित जात जावं असा काळजीयुक्त आग्रह ते माझ्याकडून बाळगत. त्यांचा खूप मोठा आधार माझ्या मनाला मिळाला. नवीन यादी जाहीर होऊ पर्यंत मी अधिकच उत्सुक होतो. त्यांच्या कार्यालयापर्यंत माझे सारखे जाणे, त्यांना भेटणे शिष्टसंमत नसल्याची जाणीव आज होते. मात्र त्यांनी तशी नाराजी कधी व्यक्त केली नाही

        प्रत्येक वेळी इतका आश्वासक आधार देऊन ते मला निरोप देत की पुढील भेटीपर्यंत वसतीगृहात प्रवेश मिळण्यासाठी वाट पाहण्यात अस्वस्थता नाही तर एक विलक्षण ऊर्जा मिळाल्याचा अनुभव येई.

        त्यानंतर थोड्याच दिवसांनी वसतीगृहाच्या नोटीस बोर्डावर  प्रवेशार्थीची पुरवणी यादी लागली. त्यात माझे नाव होते. तिथल्या तिथे प्रवेश घेतला.यादी साळवी साहेबांकडूनच आली होती. त्यानंतर त्यांच्याकडे फार तर एक दोनदाच भेटायला गेलो असेल. त्यावेळी वयाच्या मर्यादेमुळे अतःकरणीय भावुकतेने त्यांच्या प्रति कृतज्ञ होणे मला जमले नसेल. पण इतक्या मोठ्या बत्तीस तेहतीस वर्षांच्या कालावधीत  वयाच्या पोक्त अवस्थेत  सुखस्थिरपणाचा लाभ मिळण्यात ज्यांचे योगदान महत्वाचे ठरले त्यांना भेटायला कधी छत्रपती संभाजीनगरला आलो नाही. ही आता झालेली जाणीव अपराधीपणा निर्माण करणारी आहे. मला साळवी सरांना भेटायचे आहे.

                  सुरेश दगडू भिंगारदिवे, राहाता, अहमदनगर       

       

बुधवार, २७ मार्च, २०२४

 

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागांतर्गत आयोजिलेल्या दोन दिवसीय कृतीसत्राचे अहवाललेखन

अद्भूत आभासी वर्गातील पूर्ववितरित सुवर्ण मोत्यांची एकसंघ माला बनविणारे सत्र........सूत्र

        हिमालयाला सहयाद्रीचा आधार.....

      दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा...

महाराष्ट्र राज्याच्या नवनिर्माणाच्या..... स्थापनेच्या शुभारंभी वर्षातच मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळण्याचे अग्निदिव्य लिलया पार करणाऱ्या स्व.यशवंतराव चव्हाण यांची १११वी जयंती आपण नुकतीच महणजे १२ मार्च रोजी साजरी केली

      राजकारणातल्या सुसंस्कृतपणाचा उच्चतम आदर्श, शुचिता सात्विकताधिष्ठित संवेदनशीलता ज्या देदिप्यमान व्यक्तिमत्वाने उभ्या हिंदुस्थानच्या राजनितीला शिकविली त्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने सुरू केलेल्या महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा नावलौकिक स्थलकालाच्या सीमेपार, विद्वजनात, शिक्षणाच्या व्यापक विस्तृत परिप्रेक्ष्यात सर्वश्रुत-सर्वज्ञ झाला आहे.

           मूलतः स्व.यशवंतराव चव्हाण यांचा पिंड जीवनवादी लेखकाचा होता. कृष्णाकाठ या त्यांच्या आत्मचरित्रातून त्यांच्या तत्वनिष्ठ कलात्मकतेचा प्रत्यय प्रकर्षाने जाणवतो. हिंदुस्थानचे संरक्षणमंत्री, उपपंतप्रधानपद भूषविणाऱ्या यशवंतरावांच्या कार्यक्षमतेचे गमक त्यांच्या ललितकलेच्या अभिव्यक्ती विरंगुळ्यात होते. सर्वधर्मसमभावाचा आदर्श वस्तुपाठ देणारा कुलसूमदादीचा धडा माझ्या बालपणी शिकताना मी सद्गदीत व्हायचो. त्यांच्या विरंगुळा नामक धड्यानेतर डोळ्यांसमोर कृष्णेचा जीवनदायी प्रवाह कलाप्रतिबिंबित होऊन अव्याहतपणे वाहत असल्याचा भास होई. श्रांत-संतृप्त करणारे ललितकलादि संस्कार स्व.यशवंतराव चव्हाण यांनी त्यांच्या साहित्यात अक्षर करून ठेवलेले आहे. भाग्यवंतांना ते मिळते.

          यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागातील पदविका अभ्यासक्रमासाठी घेतलेल्या प्रवेशाच्या निमित्ताने ही सुसंधी मला प्राप्त झाली.

          या शिक्षणक्रमाच्या आभासी ऑनलाईन सत्रादरम्यान नाट्यक्षेत्रातील शास्त्रेतिहासाचे ज्ञान जाणून घेण्याची युक्त दृष्टी सहयोगी सल्लागार:नाट्यशास्त्र विभाग, प्रख्यात नाट्यदिग्दर्शक आदरनीय सचिनजी शिंदे यांचेकडून मिळाली.

           मायावी नगरी म्हणून चित्र-नाटय सृष्टीकडे पाहण्याची आपली मोहमयता सांप्रत माध्यम प्रभावित जीवनशैलीने नियंत्रित केली आहे. कारण चित्रपटगृह-थिएटर आदि आपल्या उंबऱ्याच्या आत, बैठकीच्या खोलीत, एवढेच नव्हे तर इंटरनेट, मोबाईलच्या निमित्ताने अगदी हातामध्ये आलेली आहेत. माहिती ज्ञानाच्या प्रस्फोटात लुप्त होण्याचा, दबून, दडपून जाण्याचा नियम शेवटी कलाक्षेत्रालाही आहेच.

 या क्षेत्रातील कला कौशल्यांचे,ज्ञानाचे योग्य व्यवस्थापन करणारे,अभिजाततेचा ध्यास घेणारे या क्षेत्रात टीकतात. कलाक्षेत्राला सृजनात्मक वारसा देणारे पायिक बनतात. रसिक प्रेक्षकांना कलात्मक आनंदाचे समाधीसुख देतात. स्वतः स्वान्तसुखाय चिदानंदात रममाण होऊन स्वर्गीय सुखाची सृष्टी निर्माण करतात.

        जीवनसाठी कला हा तत्वविचार केंद्रस्थानी ठेवून दिशादिग्दर्शन लाभलेल्या आम्हा नाट्यशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांचे दोन दिवसीय कृतिसत्र शनिवार दि. १६ मार्च २०२४ ते रविवार दि. १७ मार्च २०२४ पर्यंत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक येथे संपन्न झाले.

           शनिवार दि १६ मार्च २०२४ रोजी सकाळी परिचयसत्राने कार्यशाळेचा प्रारंभ झाला. महत्वपूर्ण  कृतींवर आधारित अभिनव अशा परिचयसत्राने परस्परस्नेहाचे चिरस्थायी अनुबंध प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याच्या आयुष्यात जोडल्या गेले.

         दुपारी १२:३० वा पासून दुपारी १:४० पर्यंत तो राजहंस एक या नाटकाचा चित्रिकरण केलेला पडद्यावरील प्रयोग पाहिला. समोर सुरु असलेल्या जीवननाट्याचा, त्यातील नायकाच्या वैफल्यग्रस्त वाटचालीचा, त्याच्या जीवनातील वा एकंदर नाट्यातील सामर्थ्यस्थळांचा प्रत्यय प्रत्यही येत होता. केवळ प्रेक्षक म्हणून हे नाटक पाहणारी एखादी व्यक्ती सभागृहात असण्याची शक्यता त्या दिवशी कदापि नव्हती. नाटक पाहण्याची मर्मदृष्टी, चिकित्सकता,व्यवहार्यता आदिंशी  विद्यापीठाच्या नाट्यशास्त्रविभागाद्वारा झालेल्या परिचयाने हे साध्य झाले आहे.

        जगाच्या पोशिंद्याची उपमा दिलेल्या कृषिवलाची बदलत्या काळानुसार इतरत्र दिसते अथवा झाली आहे तशी प्रगती,सुबत्ता नेमकी शेतकऱ्याच्या वाट्याला आली नाही. जीव जगविणाऱ्या ; अस्तित्व टिकविणाऱ्या शेतीला तुकडेवारी आणि विभाजनाने, पाटपाण्याच्या पराधीनतेने ग्रहण लावले. ग्रहणाचा काळ मर्यादीत असल्याचे म्हटल्या जाते. प्रत्यक्षात त्या काळोखछायेच्या मर्यादित खगोलस्थितीशी प्रत्येकाचाच चांगला परिचय असतो. मात्र शेतकऱ्याच्या जीवनक्रमाला अंधारछायेत टाकणारी ही ग्रहणस्थिती त्याच्या जीवाची घरघर करणारी, त्याला संपवणारी ठरते आहे. भांडवलदार, मुजोर मध्यस्थांना गबर करणाऱ्या दुःष्टचक्रात शेतकऱ्याच्या संपूर्ण कुटुंबाची वाताहत होत आहे. ती धग इतर सर्व समाजघटकाना, अशेतकरीजनांना लागणार आहे. या गोष्टीचे भान नसलेल्या उर्वरित सुखवस्तूंचे अज्ञानात सध्या तरी चांगले चालू आहे. पुढील काळ कसा असणार? या बाबीचा विचार म्हणूनच केलेला बरा. निदान शेतीतारक व्यवस्थाधीशांनी यादृष्टीने तसा विचार केला ; पावले उचलली तर चांगलेच होणार आहे. काळाच्या या मागणीला नाटकाने मुखर तर केले आहेच. पण अस्मानी सुलतानी अवकृपेनं अभावग्रस्त, हवालदिल झालेल्या वंचित कर्त्या कुटुंब प्रमुखांची ओढाताण, कुटुंबाचा भार उचलू पाहणाऱ्या धडधाकट तरुणांवर अशक्त, प्रतिकूल परिस्थितीने ओढावलेल्या भयावह मनोविकलतेवर नाटकातून प्रकाश टाकला आहे.  

                चित्रिकरण केलेल्या पडद्यावरील नाट्यप्रयोगाचा दृकश्राव्य स्वरूपातला अनुभव घेऊन माझ्यातला मी चिंतनाच्या वरील अहमिकेत असतानाच दुपारच्या सत्रात ‘तो राजहंस एक’ या नाटकाचे नाटककार मा.दत्ता पाटील नाटकाविषयीच्या चर्चेसाठी; नाट्यशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांच्या- नाटकाशी संबंधित शंकांचे समाधान करण्यासाठी अथवा नाट्यलेखन, नाटयप्रयोग आदि बाबींच्या अनुषंगाने सभागृहाच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी उपस्थित राहिले.

      त्यांच्याशी झालेल्या चर्चेचा वा विचारल्या गेलेल्या प्रश्नांची त्यांनी जी उत्तरे दिली त्यांचा मतितार्थ असा की, पुष्कळदा प्रेक्षक किंवा वाचकाचा नाटकाविषयीचा अनुभव हा हिमनगाच्या वरच्या दर्शनीभागाएवढाच असतो. अतिशयोक्तीचा भाग टाळून अथवा सकारात्मकतेच्या दृष्टीकोनातून नाटकाचा खरा अर्थ नाटयलेखक वा दिग्दर्शक यांच्या भेटीतच समजतो.

    या नाटकाची निर्मिती प्रक्रिया, नाटकाद्वारा प्रसृत करावयाचा मुख्य संस्कार, वास्तवपरिस्थितीशी नाटकाची जोडलेली नाळ तसेच  समाजातील मनोरुग्ण व त्यांच्या प्रमाणातील उपलब्ध असलेली तुटपुंजी मानसोपचार तज्ज्ञांची संख्या वगैरे बाबींवर पाटलांशी जी अनौपचारिक चर्चा झाली. तीत माहीत नसलेल्या पुष्कळ बाबी त्यांनी सांगितल्या मुळे समजल्या.. नाटयलेखकाच्या दृष्टीतूनही नाटकाचे परीक्षण वा अध्ययन कसे करावे याबद्दलच्या खूपच मर्मग्राही मार्गदर्शनाचा त्यांच्याकडून लाभ झाला. एवढेच नाही तर नाटयलेखन तंत्राचा खूप चांगला वस्तूपाठ त्यांनी शिकवला ; तो म्हणजे साधा अनुभवही अद्वितीय पद्धतीने मांडून अद्वितीय नाटकाची निर्मिती होऊ शकते. नाटकातून फक्त प्रश्नच मांडू नयेत. प्रेक्षकांना,समाजाला उत्तरेही द्यावीत. नाटककाराने समुपदेशनाचे कार्यही साधून घ्यायचे सत्कर्म करावे.

      नरेंद्र दाभोळकरांच्या परिवर्तन संस्थेमार्फत नैराश्यग्रस्त बनलेल्या आणि त्याच नैराश्यातून मनोविकृतीच्या खाईत लोटल्या जाणाऱ्या व्यक्तींच्या समस्येवर प्रकाश टाकण्याच्या.... उपाय सुचविण्याच्या उद्देशाने नाट्यलेखन करण्याचे नियोजन त्यांना दिल्या गेले होते. त्या आवाहनानुसार मा.दता पाटील आणि मा.सचिन शिंदे या नाट्यप्रेमी द्वयीने अनुक्रमे लेखक व दिग्दर्शकाच्या जबाबदारीने ‘तो राजहंस एक’ या नाटकाची निर्मिती केली.

        या नाटकात नायक नायिकांच्या एकत्र येण्याच्या सुखात्म घटनेने शेवटचा पडदा पडत नसून-ज्ञानेश या नायकाच्या नैराश्यग्रस्त मनःस्थितीतून आशादायक जीवनक्रमात झालेल्या स्थित्यंतराची खात्री प्रेक्षकांना देऊन तो पडतो. नाटकाचा शेवट सुखमय वाटावा अथवा ती तशी समस्या मला वा माझ्या समोर उद्भवल्यास करावयाचा उपाय मला या नाटकातून मिळाला आहे ; अशा सुरक्षित आणि संतोषदायक मंथनाचे नवनीत घेऊन प्रेक्षक नाट्यगृहाबाहेर पडतो.

       खूप खोलवरच्या चिंतनशीलतेतून, निर्माणात्मक वैचारिक बांधणीतून हे नाटक तयार होऊन, रंगमंचावर आले असल्याची साक्ष दत्ता पाटलांनी वर्णिलली निर्मिती प्रक्रिया ऐकूण पटली.

    युगांतापर्यंत मानवी पिढ्यांच्या निंदा, घृणा नि संतापाचे कारण ठरलेल्या दैत्य दानवांहूनही हीन ठरलेल्या हिटलरकडून मनोविकृतावस्थेतही ‘माईन कॉम्फ’ सारखी कलाकृती तयार होऊ शकते. मग आपल्यासारख्या सुज्ञ-सज्जनांनी लिहिण्याचा प्रयत्न न करणे समाजहिताचे दृष्टीने इष्ट नाही. प्रत्येक ध्येयवादी महत्वाकांक्षी व्यक्ती आतून थोडीशी सटकलेली असतेच. Eveng wise peroson have one fulish corner. पण हे वेडेपण विधायक हवे. विधायक विचारांच्या अशा झपाटलेपणात खूप प्रभावी कलाकृती निर्मिल्या जातात. म्हणून खूप लिहा. खूप व्यक्त व्हा. आपल्या गोष्टी आपणच लिहा. मेंदू सुन्न करणाऱ्या वा त्याला गतिमान बनविणाऱ्या दोलायमान परिस्थितीतल्या हेलकाव्यात, कसरतीत खरी व्यक्त होण्याची संधी असते. ती साधून आपल्या गोष्टी आपणच लिहाव्यात. आपले प्रश्न आपणंच मांडावेत. विविध माध्यमांद्वारा व्यक्त व्हावे. अभिव्यक्त होण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे लिहिणे होय. त्यासाठी प्रचंड वाचावे. कारण कणभर लिहिण्यासाठी मनभर वाचावे लागते. त्यासाठी वाचनाचा अखंडीत यज्ञ आपणांस सुरू ठेवता यायला हवा. एकमेव कथानक नसूनही अद्वितीय मांडणीच्या कलाकृतीला विलक्षण यश मिळते. ‘हंडाभर चांदण्या’, ‘कलगीतुरा’, ‘तो राजहंस एक ' या कलाकृतींचा विषय एकमेव नसूनही केवळ मांडणीतील अद्वितीयतेने त्या कलाकृतींना यशोशिखरावर नेले आहे. नाटकाला मिळालेल्या पार्श्वसंगीताने अभिनयातील पॉज भरून निघतो. तर रंगमंचाची पोकळी भरून काढण्याचे दिव्य प्रकाशयोजनेने साध्य होते. उपरोक्त नमुद नाट्यप्रयोगांना असे यशपूरक ध्वनि-प्रकाश योजनेचे कोंदण मिळाले. संगीताच्या लकेरीत, प्रकाशाच्या झोतात साकार झालेला नाटकातील तो प्रत्येक प्रसंग सामर्थ्यस्थळाच्या रुपात अद्वितीय बनला. विशिष्ट ठरला.

 

एखादी कलाकृती पाहून प्रभावित होणे म्हणजेच ती क्षमता आपण प्राप्त केली आहे असा याचा अर्थ होतो. आपण लिहू लागलो की त्याचा पहिला श्रोता आणि त्या कलाकृतीला रंगमंचावर उतरवणारा जिवलग सखा, प्रकाशक पभ्याच्या रूपातूनंही दिमतीला मिळतो. जसा कवि ज्ञानेशला ‘तो राजहंस एक’ या नाटकात पभ्याच्या रूपात मिळाला. हा पभ्या ज्ञानेशच्या विकल-विफल मनोवस्थेत सांत्वन करतो. ज्ञानेशला आधार देतो. देशी परंपरेतला हा एका अर्थाने उपचारक असा समुपदेशकच आहे. आपल्या सभोवतालातील असे जिवश्च हितचिंतकाच्या भूमिकेतील समुपदेशक वैद्य म्हणूनच आपले रक्षण करत असतात. तीन तासांच्या सलग बैठकीत नाट्यलेखक दत्ता पाटील यांच्याशी ‘तो राजहंस एक’ या त्यांनी लिहिलेल्या व सचिन शिंदे सर यांनी दिग्दर्शिलेल्या नाटकाविषयी झालेली चर्चा आमच्यासाठी संपूर्ण नाट्यशास्त्राच्या अभ्यासाला दिशा देणारी तद्वताच रंगभूमीवर सादर होणाऱ्या इतर कोणत्याही नाटकाचे रसग्रहणात्मक अध्ययन करण्यास दिशा देणारी ठरली.

          सायंकालीन सत्रात चहापानानंतर ठीक ५:३० वा. दुतर्फा हिरवाई असलेल्या रस्त्याने पायी चालण्याचा आनंद घेत प्रशस्त अशा विद्यापीठीय ग्रंथालय, जुन्या शैलीतील रंगमंच व त्या भोवतीच्या खुल्या प्रेक्षालयाला भेट दिली. ग्रंथालय सुट्टी अथवा कालमर्यादेच्या कारणाने बंद होते. पण खुल्या वातारणातील जाणीवपूर्वक तयार केलेल्या ऑपेरा थिएटर मधील प्रेक्षकांच्या आसनावर बसून रिकाम्या रंगमंचावर देखील काल्पनिक पाळीवरील अनेक नाट्यदृश्ये रंगविण्याचा मानसिक आनंद घेतला. त्या वेळात मोजक्या उत्साहींनी सादर केलेल्या नाट्यछटाही पाहिल्या.

       दिवसभरातील ब्रह्मानंदी टाळी लावणाऱ्या अगणित कलात्मक विचारानुभूतींनी मनाची झालेली  ध्यानमग्न अवस्था या सायंकालीन फेरफटक्याने.... झालेल्या पायपीटीने अधिकच गडद झाली. 

     विद्यापीठवास्तूच्या तळमजल्यालगत असलेल्या टूमदार पण उघडया तळात शिरल्यागत वाटणाऱ्या, थ्रिल देणाऱ्या रंगमंचावर सचिनसरांनी सर्वच चोवीस कलाकारांना पुन्हा सूचनाबद्ध शारीरिक कसरतीने थकवून झोपवले. श्रेष्ठ गायिका किशोरी  अमोनकर यांच्या स्वररागदारीतील ‘पंछी बोता.....’ अशा काहीशा धृपदबोलांची ध्वनिमुद्रीत सांगितिक लकेर- मंद हवेची झुळूक कर्णपटलावर स्पर्श करत आहे असे वाटावे इतक्या संथ समगतीने ऐकू येत होती. ‘ श्रमहरं चित्त विश्रांतीकारकम् ‘ अशी सगळी शरीरमनाची सुखदायक स्थिती सर्वांचीच होती. पट्टीच्या मानसोपचार तज्ज्ञाने संमोहनात नेऊन उपचारक विश्रांती  किंवा आत्म्या परमात्म्यांचे अद्वैत साधणारी योगनिद्रा द्यावी असे काहीतरी विलक्षण अनुभवत असल्याचे वाटत होते. तो चांगला प्रभाव आजही आपणांवर टिकून असल्याची जाणीव होते आहे. त्या अवस्थेतून उठून बसल्यावर आयुष्यातला एखादा दुःखद प्रसंग सांगण्यासाठी ऐच्छिक अभिव्यक्तीची त्यांनी दिलेली संधी पुष्कळांनी घेऊन दुःखद भावनांच विरेचन केलं.मनातल दुःख मनातच ठेवल्यानं ते वाढतं. अंतःवकाशात (अंतर्अवकाशात) ते मावेनासे झाल्यास त्याचा प्रस्फोट होऊन ते व्यक्तीला उध्वस्त करू शकतं. मानसिक व्याधींच्या खाईत लोटू शकतं. म्हणून वेळीच कुणालातरी वेदना सांगून वा कागदावर उतरवून मोकळं व्हांव. असं वेदनाकथन ज्यांना- ज्यांना तिथं साधलं त्यांनी ते दुःख सांगून मोकळ्या खुल्या अंतःकरणातील, अवकाशीय आनंदाच कारण असलेल ‘कॅथॉर्सिस’ अनुभवलं.

         दुसऱ्या दिवशी रविवार दि. १७ मार्च २०२४ रोजीची आणखी एक सकाळ सचिनसरांनी आमच्या आयुष्याला जोडली. पुढील आयुष्यातल्या अनेक दिवसांच्या प्राणदायी, अस्तित्वप्रधान, दिवसांची मुहूर्तमेढ त्या सकाळी त्यांनी रोवली असे मनःपूर्वक सांगणे अतिशयोक्तीचे न वाटो. त्यांनी त्या दिवशी घेतलेल्या श्वसनप्रक्रिया, आवाजाच्या साधनेचा भाग असलेल्या आवाजाची आमच्याकडून वदवून घेतलेली आवाजाची आवर्तने ; त्यांचा मंगलनाद अजूनही कर्णपटले, नेत्रेंद्रिये,मन-बुद्धी,अंतःकरण यांना प्राणस्कंद प्रदान करत असल्याचा अतिंद्रिय अनुभव आम्ही घेत आहोत. पुष्कळ वर्षांपूर्वी अभ्यासक्रमाच्या पुस्तकातून ‘तत् क्षियते प्रकाशावरणम्’ असे महामुनी पतंजलि यांचे सूत्रवचन वाचलेले आहे. प्राणायामाने आत्म्यावरील अज्ञानाची काजळी नष्ट होऊन खुल्या दिव्य प्रकाशाचा अनुभव येतो. असा या सूत्रवचनाचा अर्थ होतो. पढतमुर्खासारखे हे तत्ववचन स्मरणात आहे. तशी कृती क्वचितच यापूर्वी घडत होती. त्या दिवसापासून आजपावेतो तसा स्वाध्याय चालू आहे. तो नित्यनियमानं दररोज होत राहो. असं मी स्वतःलाच त्या दिवसापासून बजावत असतो. आवाजावर श्वासाचा चांगला प्रभाव पडतो. श्वासाच्या योग्य आयामांनी आवाजाला झळाळी मिळते. तशी नादमयताही आवाजाला मिळावी यासाठी श्वासाचा तसेच श्वासप्रभावित आवाजांच्या आवर्तनांचा ध्वनियोग नटाने दररोज करायला हवा हे समजले. चार वेदांमध्ये ‘सामवेद’ हा संगीतविषयक वेद आहे. भरतमुनींच्या नाट्यशास्त्राच्या अनुषंगाने नाटकाला पाचव्या वेदाचे दिलेले स्थान म्हणून सार्थच आहे. त्या नाट्यवेदाच्या अध्ययनाभिरूचीस पूरक असा हा यौगिक स्वाध्याय म्हणून महत्वाचा आहे.

        प्रत्यक्षात नसलेल्या बाबी अथवा स्वभाव वैगुण्ये जणू काही खरेच अस्तित्वात आहेत असे भासवण्याचा यशस्वी प्रयत्न नाटकात, चित्रपटात होतो. तो अस्सल वाटण्यासाठी साजेसा मुखवटा नटास परिधान करणे महत्वाचे असते. हुबेहूब मुखवटा वापरण्यास बऱ्याचदा मर्यादा असते. अशावेळी चेहऱ्याची केलली रंगभूषा या मर्यादेवर मात करून नेमका परिणाम साधते. केवळ मुखवट्यांना पर्याय म्हणून रंगभूषा नसून तिचा स्वतंत्र स्वयंभू असा प्रांत आहे. नानांनी रंगभूषेचे शास्त्र नाट्यकलेच्या परिपोषासाठी,नाट्यप्रसंगाचा उत्कर्षबिंदू साधण्यासाठी असलेली अपरिहार्यता आपल्या प्रात्यक्षिकातून दाखवून दिली. युवकावस्था ते वृद्धावस्था यादरम्यानची वयोमानपरत्वे घडणारी रंगरुपांची अगदी भविष्यकालीन संभाव्य कायिक स्थित्यंतरे त्यांनी लिलया दाखविली. ही रंगभूषेची शास्त्राधारित कला ते अनेक नवोदितांना शिकवत आहेत.स्वतः आपला मुलगा व स्नुषा यांना रंगभूषेची प्रात्यक्षिके शिकवून त्या ज्ञान-कौशल्यांच्या उपयोजनार्थ, गरजवंत नाट्यसंस्था, त्यांच्या नाट्यप्रयोगात रंगभूषेची सेवा देण्यासाठी ‘कायाकल्प’ स्टुडिओची त्यांनी नाशिक शहरात स्थापना केली आहे. साठोत्तरी आयुकालातही उत्फुल्ल प्रेरणेने रंगभूमीसाठी नाट्यकलावंतांना रंगभूषा देणाऱ्या.... शिकवणाऱ्या नानांना रंगदेवता अधिक बळ देवो. हा वारसा चालविणारे पायिक नानांकडून घडविले जावोत. वयाच्या साठीत गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना कागद,कुंचला,आणि रंग यांची आवड लागली होती. गुरुदेव चित्र रंगवायचे. आपल्याला भूमिकेत रंग भरायचा आहे. नाटक रंगात आणायचं आहे.

        अनेक मूलभूत हक्कांपैकी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क घटनेने प्रत्येक नागरिकास दिलेला आहे. हक्कांचा उपभोग घेताना नागरिकांकडून स्वैराचार घडू नये, स्वहीत साधताना सभोवतालच्या भागातील कुणाचेही नुकसान होणार नाही याबद्दलची आचारसंहिता घटनेतूनच नमुद करण्यात आलेली असल्याने हक्क,स्वातंत्र्याचा संयमित उपभोग घेण्याचा संस्कार नागरिक म्हणून आपणांस माहीत आहे. नाटक प्रकाशित करताना अथवा रंगमंचावर आणताना देशाच्या कायदासुव्यवस्थेस किंवा सामाजिक आरोग्यास बाधा येऊ नये म्हणून रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाची स्थापना झालेली आहे. घटनेने बहाल केलेल्या स्वातंत्र्य आणि हक्कांबाबत पालन करावयाच्या कर्तव्यांना देश पातळीवरील संदर्भ आहे. ते सर्व हक्क, ती सर्व स्वातंत्र्ये, कर्तव्ये देशभर समान आहेत. मात्र अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अनुषंगाने नाटकाच्या प्रयोगासंदर्भात जी घटना आहे जी कर्तव्ये आहेत ती फक्त महाराष्ट्र आणि गुजरात राज्यापुरतीच मर्यादीत आहे. उर्वरित देशात,कोणत्याही राज्यात असे रंगभूमी व प्रयोग परिनिरीक्षण मंडळ नाही. आपण महाराष्ट्रात राहतो आणि जर आपणांस महाराष्ट्र वा गुजरात राज्यात प्रयोगाचे सादरीकरण करावयाचे आहे तर या सेन्सॉर बोर्डाचे नियम पाळण्यास आपण बांधील राहणे क्रमप्राप्त आहे. रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाचा पत्ता, त्यांच्याकडून प्रयोग सादरीकरणासाठी परवानगी मिळविण्याची प्रक्रिया वगैरे बार्बीची सविस्तर माहिती प्रा. गायधनी सर यांनी विषद केली.

       तसेच एखादी कथा, कादंबरी यांवरून जर नाट्यनिर्मिती करावयाची असेल तर कोणत्या रितसर बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे याबाबतचे महत्वपूर्ण मार्गदर्शन आदरणीय गायधनी सर यांचेकडून मिळाले. नवीन वास्तू बांधण्यापूर्वी नगररचना विभाग वा म्युनसिपल कार्यालयाची आपण परवानगी मिळवतो. अगदी तसाच नाटक बसवण्याचा परवानावजा नाहरकत दाखला मिळविण्याचा  मार्गच गायधनी सरांनी दाखवला.तिथे त्यांना धन्यवाद देणे शक्य नाही झाले. म्हणून हे अक्षरआभार त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोंचतील असा विश्वास वाटतो.

     शेवटी हा सर्व नाट्यप्रपंच सुखेनैव चालत राहावा यासाठी आपण नीट असायला हवं. ते नीट राहणं सचिनसरांनी शिकवलं. विद्यापीठातल्या हिरव्या गर्दीतून माझ्यासारख्या बकाल, उजाड माणसासह नाट्यशास्त्राच्या वर्गातील चोवीसजणांचा उष्णतेचा लोट बरोबर घेऊन ते का बरे हिंडत होते ?..... याचं उत्तर मिळालं.

     हिरवी गर्दी बाहेरची

     डोळ्यांनी अशी ओढून

     अंतरीचे दार

     खुशाल खोलूनं.

              दूरवरचे डोंगर

         मनात उभे करावे

         अन् सुखाने चढताना  

         दुःख खाली दबावे.

        हिरवा त्यांचा वारा

        मनामध्ये आला

        संपून गेला सारा.

        एकाकी कोंडमारा.

       आपण निसर्गापासून दुरावत चालल्याने  आपल्या व्याधी वाढल्या आहेत. नाटकाचा प्रवाह प्रदुषणमुक्त ठेवण्यासाठी नटाने निरोगी असावं. निदान स्वतःचा नाट्यप्रवास निर्विघ्न आणि कलानंद देणारा ठरावा म्हणून त्यानं स्वतःला जपावं. स्वतःला तंदुरुस्त ठेवावं. तो मार्गही इथे सचिन सरांनी सांगितला. कठीण श्लोकांचे पाठांतर आणि दीर्घश्वसनाचा स्वाध्याय दररोज केल्याने वाणी आणि देहबोली दोन्ही प्रसन्न होतील. उक्ति आणि कृती यांच्यातील अद्वैत सहज साधेल. सर्वांना ते सहजसाध्य व्हावं म्हणून शुभेच्छा ! नाट्यशिक्षणाच्या मुख्यप्रवाहात आपण कधी येऊ शकू की नाही या शंकित,संभ्रमित मन:स्थितीत असतानाच विद्यापीठाने नाट्यशास्त्र विभागाची सुरुवात करून आमची नाट्यविषयक अभिरूचि शिक्षणक्रमाच्या राजमार्गाने पूर्ण करण्याचे सांस्कृतिक योगदान दिले. त्याबद्दल यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाला सविनय धन्यवाद देतो. नाट्यशास्त्र पाठयक्रमाच्या कृतिसत्रासाठी विद्यापीठीय परिसरात आम्हाला उपस्थित राहण्याची सुसंधी दिली. आमच्यासाठी अध्ययनानुकूल सुव्यवस्था ठेवली. त्याबद्दल मा.कुलगुरू महोदयांचे सविनय आभार मानतो.

                   सुरेश दगडू भिंगारदिवे, राहाता  

 

शनिवार, १४ जानेवारी, २०२३

मा.पुंडलिक गवंडी सर यांचे आशीर्वाद

 सामाजिक मनाचे  कवाडं  उघडून दाखवणारा काव्यसंग्रह 

     "कवितेच्या स्मरण ओळी"  होय.


"कवितेच्या स्मरण ओळी"  कवी सुरेश भिंगारदिवे.

      कवी सुरेश भिंगारदिवे यांचा काव्यसंग्रह जवळजवळ आठ नऊ वर्षांनी हाती आला. एक अति संवेदनक्षम असलेला हा कवी शिक्षक म्हणून आपल्या कामात दक्ष आहे. साहित्याची जवळीक साधत साधत, आपल्या मनातल्या भावना त्यांनी काव्यातून स्पष्ट केल्या आहेत.     


      त्यांच्या कविता निसर्ग आणि सामाजिक उणीवांच्या  जाणिवा करून देतात. हे करीत असताना ते स्वतः स्वतःशी  एक संवाद साधतात.  'महानगरा' या आपल्या कवितेत सामाजिक विषमते विषयीच्या अगतिक प्रश्नांची सत्य कल्पना त्यांना अस्वस्थ करून जाते.   


       भूमीचं आकाशाशी जडलेलं नातं कसं कोसळून जातं, ही वेदना आपल्या मनाला 

शून्यतेत  नेते. कृती आणि युक्तीत असणारे भिन्न विचार एक जीव व्हावे, असं त्यांना वाटतं. ही तत्व नाळ जोडण्याचा ते प्रयत्न करतात. तर वागणं या कवितेत ते ईश्वराला साक्षी ठेवून केलेल्या आपल्या उन्नत कृतींचं स्मरण करून देतात. 

      स्तुती निंदा यात श्री संत तुकारामांच्या अभंगाचा बोध होतो. ते म्हणतात की, स्तुती आणि निंदा यांची द्विधा स्थिती नाकारून जीवन जगावं. कुणी निंदा कुणी वंदा यातूनच आपण आपला जीवन मार्ग स्वीकारावा, असं त्यांना वाटतं. 

       प्रकाशाची निर्भाव दृष्टी संगत, प्रकाशाची दुर्गती दिव्यत्वाचा साक्षात्कार देऊन जाते.   


     उद्याच्या आशावाद स्वीकारून ते अंत:करणातल्या दुःखाच्या चक्रव्युवाहात अडकल्याची तक्रार या  विश्वाच्या निर्मात्याकडे करतात. घावावर घाव सुसून शांत मनानं स्वतःच  चिंतन हसत हसत करणारा हा कवी मनस्वी दमलेला थकलेला वाटतो. हे त्यांचे एकाकी जीवन मनाला वेदना देऊन जातात. यातील त्यांचे अंदाज, माणसातलं खरं रूप दाखवतात. घरट्यातलं जग,  नातं, हिरवी गर्दी,  जुनी भूत,  प्रवास, माणूस, उकल अशा छोट्या छोट्या कवितेतून ते जीवनात एक सत्य वाचकांपुढे मांडतात. माणसाचं अंतर  जग, वेदना, क्षितिज, भिंगरी, सद्दामचा फास यातून ते जगाच्या घडामोडीचा  विचार करायला लावतात . 

      नव्या युगाची साथ ऐकून जीवनाच्या वाटेवर श्रम शक्तीशी नातं हा कवी केव्हा जोडतो हे कळत नाही. हे विशेष वाटतं. साहेब, आभाळमाया, आई या कवितेतून त्यांनी माणुसकी हरवलेला सामाजिक प्रश्न उभा केल्याची जाणीव देतो. आई बापासाठी मरणारा श्रावण बाळ , आणि बाळासाठी तडफडणारी आई बापाची माया, हृदयात कालवा कालव करते.  त्यातून आजची सामाजिक स्थिती डोळ्यापुढे उभी राहते.

       जग किती आणि कस बदललं तरी श्रावणात तू खरा भाग्यवान ठरला. हे सत्य आपण नाकारू शकत नाही. काव्यसंग्रहाचा शेवट शेतकऱ्यांच्या जीवनातल्या कवितेने करताना, अंतरीचं शिवार खुल्याची सत्यता पटते. श्रमजीवनात मानवी जीवन किती महत्त्वाचा आहे,  हे ते सांगून जातात. एकंदरीत या कवितेच्या स्मरण ओळी जरी छोट्या मोठ्या स्वरूपातून जाणवतात, तरी त्या छोट्यातून मोठ्यांच्या समस्या असल्याचे प्रतिपादन होतं. त्यांच्या कविता ह्या जीवनाचे एक अंग स्पष्ट करून जातात, आणि ते म्हणजे समाजात किती तरी सामाजिक विषमता असल्याची जाणीव होते. अजून त्यांच्या मनात खूप काही सांगायचं आहे. हे सुद्धा जाणवतं. त्यांच्या विचारांना आणि लेखणीला शुभेच्छा देऊन, त्यांच्या या पहिल्या काव्यसंग्रहाचं सुयश चिंतितो.

       धन्यवाद!

       त्यांच्या हातून असंच वैचारिक मानवी मूल्यांचे दर्शन घडावं, यासाठी त्यांना भरभरून आशीर्वाद !

     आपला ,

     पुंडलिक गवंडी , 

     ज्येष्ठ साहित्यिक , अकोले.

    दिनांक 25 / 11 / 2022 

    मो. 92 72 13 59 11 .

शनिवार, २४ डिसेंबर, २०२२

शुभेच्छामंडल

 विधायक, शुभेच्छारुपी शब्द ही परमेश्वराची अनेकविध रूपे होत.जगद्गुरु तुकाराम महाराजांनी शब्दांठायी असलेली अस्त्र-शस्त्र,धनरूपी संपत्तीची महानता वर्णिली आहे.देवप्रतिमेची अनभिज्ञता मान्य करुन   'ओंकार ' स्वरुपात देव पाहण्याचा सुलभ सोपान ; धार्मिक ग्रंथ,अधिकारी संत-महंत यांनी आम्हांला दर्शविला आहे.प्रारंभी देव शब्द होता. शब्द देवासह होता. असा उल्लेख पवित्र धर्मग्रंथ बायबल मध्येही आलेला आहे. अक्षर ब्रह्माच्या मंगल चिंतन,मनन-निदीध्यासात योगीजन मनाच्या प्रबळतेचा अनुभव मिळवतात. ती तशी शुचिता,शरीरमनाची सौष्ठवता मिळवण्याच्या मार्गावरील सहप्रवासी आपण आहोत.


          आपणा शब्दपूजक, शुभवाणीप्राप्तजनांकडून वाढदिवसाच्या निमित्ताने मला मिळालेल्या शुभेच्छा, आशीर्वाद मी कृतज्ञता पूर्वक स्वीकारून माझ्या अंतर्यामात त्यांना ठेवले आहेत. त्यामुळे मी श्रीमंत आहे. भविष्यात तील वाटचाल करण्यास हे संचित मला लाभदायक ठरणार आहे असा विश्वास वाटतो. विश्व मंडलात सर्वकाही संग्रही राहते. ते अक्षय असते. म्हणूनच वाढदिवशी माझ्यासाठी आपण व्यक्त केलेल्या शुभेच्छा विश्व मंडलात सुरक्षा ठेव म्हणून माझ्यासाठी सुरक्षित असणार आहेत. त्यांचा  सुपरिणाम आपणासही मिळो या कृतज्ञतेसह, शुभेच्छांसह आपणास धन्यवाद देतो.

शुक्रवार, ९ डिसेंबर, २०२२

वाढदिवस:महामारीतील काळोखातला

 पिंजऱ्या बाहेर काढलेल्या वाघ-सिंहाचे थरारक प्रयोग एक रिंग मास्टर सर्कशीत दाखवत होते. त्याच वेळी नेमकी वीज गेली. तिच्या उपलब्धतेची वानवा असलेल्या त्या काळात ; सर्कशीच्या महाकाय तंबूत, प्रेक्षकांच्या भरगच्च गर्दीत हाहा:कार उडाला असता. अनेक निरपराध कालःहत झाले असते. मात्र त्याच वेळी कोणा एकाने आगपेटीची काडी पेटवून " प्रकाश-प्रकाश "अशी आरोळी ठोकली. प्रतिसाद स्वरूप तेथील इतर जणांनीही काडी पेटविण्याच्या , त्या कृतीचे अनुकरण केले. पुरेसा प्रकाश त्या तंबूत पसरला. रिंग मास्टरने तेवढी वेळ साधत वाघ-सिंहाना पिंजऱ्यात नेले.तोपर्यंत विजेची पर्यायी व्यवस्था झाली.प्राणहानी टळली.

       संसर्गित विषादाचा काळकाळोख आपल्याभोवती पसरलेला आहे अशा भीतीत वावरताना ; प्रियजनांच्या अंत:करणातून बाहेर पडणाऱ्या शुभेच्छा प्रकाशाचे दान देतात. सावरायला आणि निर्विघ्नतेने चालायला वाट दाखवतात. पहिली काडी चेतविणारा व तद्नंतर त्याचे अनुकरण करणारा प्रकाशयात्री समूह खूप मोठे विधायक कार्य करत असतो. आज माझ्यासाठी आपण ते केलेत.आपणाला धन्यवाद देऊन त्याचा स्वीकार करतो. आपल्या शुभेच्छांना प्रार्थना मानून शांत-खंबीर मनाने चालत राहतो .
             सुरेश भिंगारदिवे,
                          

गुरुवार, ८ डिसेंबर, २०२२

बर्थडे इन क्वारंटाइन डेज

 वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देणाऱ्या आपणा सर्व समूह जनांना सविनय धन्यवाद. सूक्ष्मतम विषाणूमुळे सर्वांनाच युद्धजन्य जीवनक्रमाला सामोरे जावे लागत आहे . मनःस्थिती विफल करणाऱ्या अनेक घटनाही दरम्यानच्या कालावधीत आपल्या मित्र, स्नेही यांच्या पारिवारिक जीवनात घडल्या. सर्वच समाज जीवनावर दूरगामी परिणाम करणारी व्याधी, तसेच आपल्या जवळच्या व्यक्तींवर ओढवलेल्या संकटांच्या पार्श्वभूमीवर उत्सवप्रियता, सत्कारसाजरीकरण यांवर मर्यादा पडणे स्वाभाविक आहे. त्या मर्यादा आपण पाळत आहोतच. त्यातला एक घटक मीदेखील आहे. व्याप, वाताहत यांच्या अनामिक भीतीचे मळभ सांप्रत काली इतरांप्रमाणे माझ्यावर सुद्धा आहे. प्रियजनांच्या शुभेच्छा खडतर प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी बळ पुरवणाऱ्या असतात. आपल्या स्नेहभारीत शुभेच्छांचा स्वीकार करताना ही जाणीव मनोमन मलाआहे. त्या सशक्त संवेदना माझ्यासाठी आत्मविश्वासपूरक अशा आहेत. आपल्या शुभेच्छा संदेशाद्वारे ते बळ मला निश्चितपणे मिळाले. सद्यस्थितितील दुःस्थितितून संपूर्ण निर्विघ्नतेकडे ,आरोग्यपूर्ण संक्रमण होण्यासाठी सर्वांसाठी प्रार्थना. शुभेच्छा. आपल्याविषयीच्या कृतज्ञतेसह !

                                                     आपला

                                       ..       सुरेश भिंगारदिवे

बापाची आठवण

 बापाची आठवण


    आता दिवस मोजत मरुपर्यंत

    बापा तुझी आठवण नाही संपत


    तुझा अन्नरस सत्वशील भारी

    त्याची उभारी;त्याची शिदोरी

    मी घेऊन फुललो,तू झिजला कष्टत

    बापा तुझी आठवण नाही संपत

    

     निःसंगता तुझी यापुढची

    पोकळी पोरक्या रितेपणाची

    आमरण काहिली घरघर, साहून मी जीवंत

    बापा तुझी आठवण नाही संपत


    घर अन् धनाचा , तू दिला दायभाग

    आणि वाढलेली , तुझी संपन्न बाग

    जाळली हकिम खळांनी , ज्यांचे विषारी हस्त

    बापा तुझी आठवण नाही संपत


                        - सुरेश भिंगारदिवे

                            श्रीरामपूर

 सर्वांना सप्रेम नमस्कार🙏2015 सालातील हिरोशिमादिनी मित्र परिवारात साजऱ्या झालेल्या माझ्या वाढदिवशी माझ्यातल्या अभयी बालवृत्तीला पाहून माझ्य...