फॉलोअर

रविवार, ३१ मार्च, २०२४

मिलिंद'ने दिलं सुज्ञपणाचं देणं.... सार्थकी जगणं !

 

आजपासून मागील बत्तीस तेहतीस वर्षांपूर्वीच्या ; मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादेत मी माझं अननुभवी नि संकुचित अस्तित्वाचं हरवलेपण घेऊन आलो होतो. शासकीय वसतीगृहातील प्रारंभिक प्रवेशार्थी यादीत मी नसल्याने सुरवातीचा माझा मुक्काम कॉलेजच्या वसतीगृहात होता. तिथेही खोली न मिळाल्याने परिस्थितीचे भांडवल करत  कॉमनहॉल मध्ये राहण्याची सवलत मिळवली.  पहिल्याच दिवशी तिथे माझा अंगावरचा बिछाना चोरी गेला. तेवढे निमित्त मिळाल्याने मी घरी निघून आलो. हायस्कूलच्या बोर्डींगमधून असा न विचारता घरी गेलला विद्यार्थी पळकुटा ठरतो. पण दहावीनंतर कॉलेजला आलेल्या विद्यार्थ्यांचे प्रौढपण त्या-त्या स्थानिक संस्थेने गृहीत धरलेले असल्याने माझ्या पाठलागाचा प्रयत्न वा सुरक्षित असल्याबाबतची खात्री ट्रेनिंग कॉलेज वा त्याच्याशी निगडीत असलेल्या वसतीगृहाने करण्याचे काही कारण नव्हते.

         घरी चार दोन दिवस राहिल्यानंतर लोकनिंदा अथवा पुढील भविष्याच्या काळजीने कुटुंबियांनी पुन्हा मला औरंगाबादला जाण्यास भाग पाडले. ते साहजिकच होते.

         कॉमन हॉलमध्ये राहून कॉलेजमध्ये जाणे, वर्गात बसणे माझ्यादृष्टीने कठीण होते. ती माझीच नकारात्मकता होती. माझ्या सारखीच परिस्थिती असलेल्या पुष्कळ विद्यार्थ्यांनी खंबीरपणाने स्वतःला सावरून घेत शिक्षणाचा यज्ञ चालू ठेवला होता. मला मात्र ते जमत नव्हते. तशी आणि तेवढी क्षमता माझ्यात नव्हती. रडून रडून हवी असलेली गोष्ट मिळवण्याचा पोरकट बाल अट्टाहास इथंही मी प्रभाकर साळवी भाऊसाहेबांकडे केला. पूर्वीचा कोणताही संबंध नसताना या दयाळू माणसानं मला धीर दिला. जयसिंगपुरा येथील शासकीय वसतीगृहात नियमाच्या बाहेर जाऊन माझं तात्पुरतं पुनर्वसन त्यांनी केलं. कार्यालयातून त्यांची सुट्टी झाल्यानंतर सिडको वसाहतीपासून इथपर्यंत ; खूप लांबच्या अंतरावर स्वतःच्या मोटारसायकलवर त्यांनी मला आणून सोडले.  आदरणीय खिल्लारे सर  अधिक्षक असलेल्या वसतीगृहात माझ्या आश्रयाची तात्पुरती व्यवस्था त्यांनी केली.माझ्यासाठी त्यांना तिथे खिल्लारे सरांकडे विनंती करावी लागली.

पुढील यादीत नाव येईल असा आशावाद देत कॉलेजला मी नियमित जात जावं असा काळजीयुक्त आग्रह मला ते प्रत्येक वेळी करत. त्यांचा खूप मोठा आधार माझ्या मनाला मिळाला. नवीन यादी जाहीर होऊ पर्यंत मी अधिकच उत्सुक होतो. त्यांच्या कार्यालयापर्यंत माझे सारखे जाणे, त्यांना भेटणे, वसतीगृह प्रवेशाच्या निवडयादीविषयी विचारणा करणे शिष्टसंमत नव्हते. पण माझ्याकडून ती चूक घडत होती. विचारांच्या संकुचितपणामुळे अथवा मोफतचे अधिक मिळवण्याच्या हव्यासातून मी अधिकच उत्सुक झालो होतो. त्या चुकांची जाणीव नंतर प्रकर्षाने होत गेली. मात्र त्यावेळी साळवी साहेबांनी तशी नाराजी कधी व्यक्त केली नाही.

        प्रत्येक वेळी इतका आश्वासक आधार देऊन ते मला निरोप देत ; की पुढील भेटीपर्यंत वसतीगृहात प्रवेश मिळण्यासाठी वाट पाहण्यात अस्वस्थता नाही तर एक विलक्षण ऊर्जा मिळाल्याचा अनुभव येई.

        त्यानंतर थोड्याच दिवसांनी वसतीगृहाच्या नोटीस बोर्डावर  प्रवेशार्थींची पुरवणी यादी लागली. त्यात माझे नाव होते. कॉलेजजवळच्याच ‘मिलिंद’ वसतीगृहात प्रवेश मिळाला होता. तिथल्या तिथे प्रवेश घेतला.यादी साळवी साहेबांकडूनच आली होती. त्यानंतर त्यांच्याकडे फार तर एक दोनदाच भेटायला गेलो असेल. त्यावेळी वयाच्या मर्यादेमुळे अतःकरणीय भावुकतेने त्यांच्या प्रति कृतज्ञ होणे मला जमले नसेल. पण इतक्या मोठ्या बत्तीस तेहतीस वर्षांच्या कालावधीत  वयाच्या पोक्त अवस्थेत  सुखस्थिरपणाचा लाभ मिळवून देण्यात ज्यांचे योगदान महत्वाचे ठरले त्यांना भेटायला कधी छत्रपती संभाजीनगरला आलो नाही. ही आता झालेली जाणीव अपराधीपणा निर्माण करणारी आहे. मला साळवी सरांना भेटायचे आहे.

   ‘मिलिंद’ ही वसतीगृहाची इमारत खूप प्रशस्त. तळ मजल्यावर आणखी दोन मजले चढवलेले. माझ्या तोकडया अनुभवविश्वानुसार तिला मी तीन ताळाची इमारत म्हणत असे. मधल्या ताळातल्या एका वरिष्ठ विद्यार्थ्याने पठाणसरांच्या सांगण्यानुसार आपुलकीने मला त्याच्या खोलीत नेले. माझी काळजी घेणारी आणि माझ्यात सुरक्षिततेची भावना निर्माण करणारी अशी ती वडिलधारी मंडळी होती. चांगली अभ्यासबैठक व्हावी अशी टेबल,खुर्ची आणि पलंगाची मांडणी त्या खोलीत मी केली. भिंतीतल्या कडाप्यांच्या एक-दोन कप्यात पुस्तकं ठेवली.

         संध्याकाळी मेसमध्ये जेवण करताना वरच्या मजल्यावरील एका मोठ्या मुलाने वरच्या मजल्यावर रहायला येतो का ? वरती आमच्या शेजारच्या खोलीत एक जागा आहे. ये तिथं. मधल्या मजल्यावर त्यांच्यात काय राहतो ! वरच्या खोलीत सगळे आपलेच आहेत.” अशी द्वेषपेरणी त्याने माझ्या मनात केली. मला ते समजले नाही. तितकं शहाणपण आणि चांगुलपण माझ्यात नव्हतं. आणखी एका मजल्याने वर असलेल्या तिसऱ्या ताळावरील खोलीत राहून उंचावरच थ्रील अनुभवण्याचा खुजा विचार मनात आला

       मधल्या मजल्यावरून आणखी एका मजल्याने वर असलेल्या तिसऱ्या  ताळातल्या खोलीत शिफ्ट झालो. पण आधीच्या खोलीतील मंडळी नाराज झाली. त्यांना दुखावून बाहेर पडलो होतो. कुणाच्यातरी भेदनीतीला माझं संकुचितपण बळी पडलं होत.

        नवीन खोलीतील मंडळीही चांगलीच होती. पण रात्र होऊनही झोपेच्या अधीन न होणारी ही जागरूक मंडळी मला माझ्या झोपेची शत्रूफळी वाटू लागली. एका टेबलवर तर आकाशवाणी चालू होती. रेडिओ सिलोन, विविधभारती यांसारखी केंद्रे माझ्या झोपचं स्वातंत्र्य हिरावून घेणारी शत्रूतळं आहेत असं मला आता वाटू लागलं. मध्यरात्र उलटून गेली तरी रेडिओ बंद होत नव्हता.  बाहेरच्या दाट होणाऱ्या रात्रीच्या वातावरणात रेडिओ कमी आवाजात असूनही एक एक गाणं एकेका पंक्तिसह स्पष्टपणाने ऐकू येत होतं. शाळेतल्या गायक विद्यार्थ्यांच्या पहिल्या समुहात माझा बोलबाला होता. दहावीच्या बोर्डाची परीक्षा चालू असताना, दुसऱ्या दिवशीच्या हिंदी पेपरची काळजी न करता मी तालुक्याला जाऊन ‘मिलन’ हा जुना अभिजात चित्रपट पाहून आलो होतो. तिकडे गावाकडे घरात अजून टीव्ही नाही. इथं होस्टेलला या मजल्यावर टीव्ही हॉल आहे. त्या हॉलनेही मला खुणावले होते. वरच्या मजल्यावर येण्याला ते देखील एक कारण होतं. सध्या टी.व्ही. नादुरुस्त असल्याने आज तो पाहता आला नव्हता. उद्या तो दुरुस्त होऊन आला आणि असे अवेळी त्याला कुणी चालू ठेवले तर आपल्या अभ्यासाचं,झोपेचं काय होणार ? या विचाराने झोप मोडून डोळे पूर्णपणाने उघडले. आता यावेळी लगेच खाली जाऊन त्याच खोलीत आपलं बस्तान बसवावं असं तीव्रतेने वाटलं.

     सकाळ व्हायची वाटच पाहत होतो. साडेपाच सहालाच साहीत्यासह खाली; त्या कालच्याच खोलीत आलो.पण त्या खोलीतल्यांनी लगेच “आमच्या रूममध्ये आता राहता येणार नाही. दुसऱ्या खोलीत तू तुझी व्यवस्था कर.” अशी सज्जड तंबी दिली. माझ्याविषयीचा राग आणि नकार त्यांच्या मुद्रेवर स्पष्ट दिसत होता. तो संपणारा नव्हता. माझी चूक मला कळली होती. त्यांच्याकडे ती कबूलही केली. त्यांनाही माझा पश्चाताप समजत होता. पण वय आणि त्यापरत्वे येणाऱ्या समजूतदारपणापेक्षा सूडाची भावना त्यावेळी त्यांच्यात जास्त होती. मला तरीही त्यांच्यातच राहण्याची  ईच्छा होती. एवढा विश्वास मला त्या स्थितीतही त्यांच्याविषयी वाटत होता. पण त्यांना आता मी नको होतो.

      “ दहा वाजता ऑफीस उघडेल. पठाण सरांकडून दुसऱ्या खोलीत राहण्याची व्यवस्था करून घे. इथं तुझं हे साहीत्य दिसायला नको.” अशी धमकीच त्यांनी मला दिली. त्यांचा तो असहकार मला परवडणारा नव्हता.

      सकाळी ऑफीस उघडल्यानंतर पठाण सरांकडून खोली बदलून घेतली. खालच्या मजल्यातली स्वच्छतागृहाजवळची खोली नव्यानं मिळाली. गावाकडे देखील माझ्या गल्लीतल्या घराजवळ ग्रामपंचायतीने बांधलेली दहा-बारा स्वच्छतागृहे आहेत. अविवेकी प्रलोभनांच्या आहारी जाण्याच्या फलस्वरूप सर्वात वरच्या मजल्यावरून खाली जमिनीवर असा येऊन पडलो ; म्हणून सुधारलो.

       चांदोबा सूर्यवंशी, बिपीन  जैस्वाल आणि विठठ्ल कोलते ही माझ्याच वयाची मुलं नवीन खोलीत होती. बिपीन जैस्वाल हा शरीराने कमालीचा विकल,विपन्न आणि अधू होता. पण मनाने आजच्या भाषेत दिव्यांग होता. बारावी वाणिज्य शाखेत त्याचे शिक्षण चालू होते. जेमतेम चारफुट उंच शरीरयष्टी. ती देखील एका बाजूने पूर्णतः अतिकृष वा शुष्क झाल्यासारखी वाटावी अशी. पाठीमागे एका खांदयाचे भले मोठे कुबड निघालेले. आमचं सूत्र खूप चांगल जुळून आलं. जैस्वालला स्वतःचे कपडे धुणे अशक्य असल्याने लॉन्ड्रीमधून ते त्याला धुवून आणावे लागत. त्याचे ते कपडे मी धुवून देऊ लागलो. पुढे पुढे माझ्या विश्वासावर तो एकटाच बाथरूममध्ये जाऊन कपडेधुलाई पावडरमध्ये कपडयांना भिजवून ठेवी. त्यांना पिळणे,वाळवणे याकामी मग तो मला बोलवायचा. त्याच्या बी.कॉम. पदवीच्या तिनही परीक्षांचा मी लेखनिक राहिलो. तो कधी नापास नाही झाला. त्याचा कधी विषय बाकी नाही राहिला. एम. कॉम. संपल्यानंतर 'अम्बा','अप्सरा' या चित्रपटगृहां समोर हातगाडीवर त्याने धंदा सुरु केला. जिद्द आणि चिकाटी एकवटून ठेवत, त्यांचा योग्य वापर योग्य वेळी करण्याचे कसब त्याला पुरते जमले होते. विवाहानंतर पत्नी, मुलगा, मुलगी यांच्यासह तो आनंदातच होता.कॉमर्सचे शिक्षण प्रत्यक्ष जीवनात वापरून पुढे त्याने भाडेतत्वावर एक गाळा थाटला. आजच्या संभाजीनगरातल्या नारळीबागेत एक फ्लॅटही विकत घेतला. फोनवरून आमचा संवाद खूप चांगला चालायचा. पण आज तो नाही. पाचसहा वर्षांपूर्वीच आजाराचे किरकोळ निमित्त होऊन तो मयत झाला. निसर्गाने त्याला दिलेल्या विकल शरीराची कालमर्यादाच तेवढी असणार !

           खोलीतला दुसरा रूम पार्टनर होता- चांदोबा सूर्यवंशी. सकाळी खूपच लवकर कॉलेजात जाताना आणि तेथून परत आल्यानंतर फक्त अभ्यास करताना, नीब असलेल्या  फाऊटंन पेनने सुंदर - सुवाच्च अक्षरात जरनल लिहिताना वा नोट्स काढतानाच मी त्याला नेहमी पाहत असे. देशांतर्गत वा जागतिक पातळीवरील क्रिकेटच्या मॅच मात्र तो पाहिल्याशिवाय राहत नसे. होऊन गेलेल्या जुन्या सामन्यांची क्षणचित्रे अगदी रात्री अपरात्री टिव्ही हॉलमध्ये जाऊन पाहत बसायचा. बारावीला चांगला ग्रुप आणि ॲग्रीकेट मिळवून एम.बी.बी.एस. ला जाण्याच्या ध्येयवादावर मात्र तो अढळ होता. हॉस्टेलमार्फत मिळालेल्या दिडशे रुपयांपैकी शंभरएक रुपये तो घरीही पाठवायचा. खूपचं सामान्य आणि दारिद्रयाने ग्रासलेल्या कुटुंबातला हा चांदोबा अव्वल गुण मिळवून मेडिकलला गेला सुद्धा. मेडीकलचे शिक्षण पूर्ण करून वैद्यकीय अधिकारी म्हणून तो कुठेतरी कार्यरतही होता. या अभ्यासशील ध्येयाकांक्षी डॉक्टरला भेटून जुन्या आठवणींना उजाळा देण्याचे मनात ठरवले होते. पण मध्यंतरी नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात स्वाईन-फ्ल्यूच्या संसर्गानं झालेल्या त्याच्या निधनाची बातमी वर्तमानपत्रातून वाचली. उमेदीच्या वयात जग सोडून गेलेल्या चांदोबाची आठवण खूपदा होते. अस्वस्थ करते.

         पदमपुरा येथील मिलिंद व संत तुकाराम ही एकमेकांलगत असलेली वसतीगृहांची जोडी आणि जयसिंगपुरा येथील विद्यापीठ परिसरालगत असलेले डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह यापैकी ज्या कोणत्या वास्तूत आपण राहिलो त्या वास्तूने आपल्याला निवारा दिला. ‘ज्ञान जागेपणी सोबत करते तर रात्री ते आपले रक्षण करते’    या अर्थाचे एक सुवचन बायबल मधील नीतिसूत्रांच्या प्रकरणवजा पुस्तकात दिलेले आहे. या जागेपणा आणि निद्राधीन अवस्थांतील ज्ञान प्रभावित वास्तव्याचा कोवळा काळ   वसतीगृहाच्या रक्षक तटबंदीने सर्व अरिष्टांपासून सुरक्षित ठेवला. त्याला जपले. कल्याणकारक आयुष्यासाठी शिक्षणाचा यज्ञ चालू ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांना बाहेरच्या व्यवहाराची धग लागू दिली नाही. विद्यार्थी अवस्थेत आवश्यक असणाऱ्या आदर्श अशा सर्वच  बाबी वसतीगृहाने पुरवल्या. सांप्रतकाळीही काल्पनिक वाटाव्यात अशा सोयीसुविधा त्या काळात 'मिलिंद', 'संत तुकाराम', 'डॉ.बाबासाहेब आंबेडकर' या व यांसमान शासकीय वसतीगृहातून विद्यार्थ्यांना मिळत होत्या. हितकारक आयुष्यासाठी वसतीगृहाने भौतिक स्थेर्य तर दिलेच पण त्याबरोबरीनेच शाश्वत आत्मोन्नतीसाठीच्या कलासाहित्यादि संस्कारांचे, नीतिमूल्यांचे संस्करण विविध कार्यक्रम, उपक्रम, दिनविशेष वगैरेचे औचित्य साधून आमच्यात संस्कारित केले. घरापासून दूर असताना कुटुंब नामक घरटयाची परिवारात मिळते तशी संजीवक ऊब मिलिंद वसतीगृहात मिळाली. आजच्या सुखस्थिर आयुष्याची मुहूर्तमेढ वसतीगृहाने केलेल्या तत्कालिन संगोपनामुळेच रोवल्या गेली आहे. वसतीगृहाने दिलेल्या या अफेड देयदानाचे स्मरण आजीवन राहील.

                            सुरेश दगडू भिंगारदिवे,

                             राहाता, अहमदनगर 

                             ९८६०२०२३८६    

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

 सर्वांना सप्रेम नमस्कार🙏2015 सालातील हिरोशिमादिनी मित्र परिवारात साजऱ्या झालेल्या माझ्या वाढदिवशी माझ्यातल्या अभयी बालवृत्तीला पाहून माझ्य...