फॉलोअर

गुरुवार, १६ जानेवारी, २०२५

भाऊ

 शाळेच्या ऑफिसात भाऊने आणलेली चप्पल आता तुटली आहे .भाऊ चप्पल कारागीर आहे का? असा प्रश्न एकाने विचारला त्याला दिलेल्या उत्तरादाखल पुढील भाष्य करावे लागले. भाऊ खरेच कोण होता?.....रांजणखोलचा कुंभार...श्रीगोंद्याचा अना-गोंदया...वस्तू व सेवाकर कार्यालयाचा कमिशनर! एवढ्या मोठ्या महामहीम महोदयास फक्त आपणच भाऊ म्हणून संबोधू शकतो.'सत्ते पे सत्ता ' चित्रपटातील सर्वांना सांभाळणारा भाऊ म्हणून सर्वजण त्याच्यापुढे एकेकाळी झुकायचे.बिचारा कुटुंबीयांसाठी 'वाल्ल्या' झाला.एखादा देवमाणुस भाऊला भेटावा. त्याच्या कृपाशिर्वादाने उर्वरित राहिलेल. ' कर काण्ड 'प्रकरण पूर्ण व्हावे.या सदिच्छे सह कार्यालयाच्या स्वच्छतागृहाबाहेर आपण नवीन खडावांची प्रतिष्ठापना करूयात.एवढेच आपल्या हाती. भाऊच्या हौदात पाण्याची वाणवा,कमतरता न पडो.या सदिच्छे सह.

भाऊला आता साहेबांनीच घरी बसवलय. तोंडात भरमसाठ मूग कोंबून. लगेचच संस्थानच्या तिजोरीवर फणा उभारलेला दुसरा नागोबा त्यांना नेमावा लागला. त्यांना तसे करणे भागच होते.राज्याचे सर्व कारभारी मुंबईलाच अधिकाधिक वेळ असतात. शुक्ल किंवा कृष्ण पक्षातील ठराविक दोन दिवस संपर्क कार्यालयात ते हजेरी लावतात. उर्वरित काळात एखाद्या धुरंधर चाणक्याला बसवून त्याच्या मार्फत कार्यालय चालवतात. साहेबांचे याप्रमाणेच सारे चालले होते. एज्युकेशन सोसायटीच्या बहुतांश शाळा,तेथील शिक्षक यांच्यावर भाऊचा वचक चांगलाच बसला होता. शासकीय अनुदानावर संस्थेची जहागिर सांभाळणा-या मूळ मालकाला अर्थात नामदार साहेबांना घाबरणे दूरच; ऑफिसातली सारी मंडळी भाऊलाच भीत.  

कर्मचा-यांच्या अगोदर अर्ध्या-पाऊण तासाच्या फरकाने हजर राहून भाऊ त्यांना दहशतीत ठेवायचा.सर्वांना कामाला लावून चोर पावलांनी घरी जाऊन दुपारची मस्त झोप घ्यायचा;आणि पाच वाजण्याच्या अर्धा तास पूर्वी , ऑफिसातल्या खुर्चीवर तो येऊनही बसायचा.भाऊच्या आवाजात एक जीवघेणी जरब होती.चाबकाच्या आवाजाने गाया-घोडे,बैल आदि मुकाट्याने पळावीत तशी शाळेतली मुलं वर्गाच्या दिशेने शिस्तीत जायची.तर शिक्षक मंडळी आपण किती प्रामाणिकपणे शाळेसाठी झटत आहोत;पोटतिडकीने शिकवत आहोत असे खरे खरे दाखवण्यासाठी धडपडत होती.तसे हे खरे ही होते.तितकेसे अनुकूल मत नसलेल्या तालुक्यातील या मोठ्या शाळेत शहाणी माणसं यायला उत्सुक नसत.

या पार्श्वभूमीवर गोरगरीबांच्या वंचित लेकरांच शिक्षण व्हावं अशा उदात्त भावनेने भाऊ या शाळेत आला होता.खास तीन ते चार लाख रुपये एवढ्याच साठी त्याने मोजलेत हे देखील आम्हाला बाहेरुन समजायचे.एक मात्र कबूल करावे लागेल की भाऊने सर्व स्टाफची नाडी ओळखली होती. एकेकाच्या शक्तीस्थळाची किंवा उणेपणाची अचूक-अदृश्य परीक्षा घेऊन त्या-त्या व्यक्तीला तो चांगलाच पळवायचा.त्याओघात शाळेचे नि विद्यार्थ्यांचे आणि योग्य वेळ साधून स्वतःचेही विकासकाम साधून घ्यायचा.बांधकामाची व्यवसायबुद्धी असणा-या दीपराज सरांना घरच्या बांधकामाचे तोंडी कंत्राट देऊन त्यांच्याकडून तळमजला बांधून घेतला. मजुरांच्या कार्यक्षम टोळ्या आणून भाऊच्या घराला हाथ लावणारा हा टोळीप्रमुख आम्ही पुढे हतबल होताना पाहिला.दीड-पावणेदोन लाखांची तळमजल्याच्या बांधकामापोटी झालेली मजुरांची मजुरी दीपराजनेच कर्ज काढून चुकती केली.

            भेटलेले नैसर्गिक अक्राळ-विक्राळ रुप व धूर्त त्रुटीशोधक बुद्धीची देणगी या बाबी भाऊला हिटलर बनवण्यास कारणीभूत झाल्या. 'आठशे खिडक्या; नऊशे दारं 'असलेल्या इमारतीतून खाजगी कामाच्या निमित्ताने वारंवार शाळेेच्या बाहेर पडणारा सर्जेराव वाघ एकदा भाऊने पकडला.भाऊला पाहताच तो आवारातच चक्कर येऊन पडला. फिट्सचे बरे झालेले दुखणे त्या दिवसापासून त्याच्या मागे लागले.सगळा स्टाफ त्या दिवसापासून त्याला 'चक्रवर्ती' असे संबोधू लागला.

   साहेबांच्या निधीतून आलेल्या एकूण संगणकांपैकी कांही संगणक भाऊने गुपचूप घरी नेले. इलेक्ट्रॉनिक फंडाची कास नव्या अर्थाने भाऊने धरली.मात्र वयोमानपरत्वे म्हणा किंवा अति मोह आवरता न आल्याने भाऊचे 'माठेपण' त्याचे त्यालाच संपवता आले नाही. म्हणून तर ऑफिस स्टाफच्या वार्षिक उत्पन्नावरील अडीच-तीन लाखांचा कर सरकारी तिजोरीत जमा न करता स्वतःच्या खाजगी बांधकामावर त्याने तो उडवून टाकला.दहा वर्षांपासून चालू असलेले आणि प्लिंथलेव्हल पर्यंत येऊन थांबलेले 'कल्पतरु' लाॅजचे बांधकाम मार्च एन्डला शाळेेेच्या खात्यात शिल्लक असलेले सेस 

अनुदान काढून सुरु केले. वस्तू व सेवा कर कार्यालयात वर्षाला भरावयाचा अडीच तीन लाखांचा टॅक्सही त्याने लुटमारीचा फंड म्हणून वापरुन टाकला.नेमका भाऊ येथेच अडकला.आर्थिक वर्षातील संपूर्ण स्टाफचा कर भरला न गेल्याने आम्हाला आयकर विभागाने नोटीसा पाठवल्या. अपहार उघड झाला.


  आमचा टॅक्स आयकर विभागापर्यंत पोहोचला नसल्याने आम्हीही चोरच झालो. करबुडवे ठरलो.भाऊने आमचा खिसा कापला. भाऊचे प्रमोशन तर जवळ आलेले. बोभाटा होऊन प्रमोशनवर गडांतर यायला नको म्हणून तो कामाला लागला. सगळ्या गुणदोषांसह भाऊला मित्र म्हणून स्वीकारणारे 'लोखंडे 'पुन्हा भाऊच्या कामी आले.स्वतःच्या नावाने कर्जरोखा करुन भाऊला 

त्यांनी चार लाख रुपये दिले.पण ते चार लाख भाऊचे आठ घोटाळे मिटविण्यासाठी पुरेसे नव्हते.सिंहस्थ कुंभमेळ्यात आपल्या शहरात गर्दी वाढेल. संस्थानी आश्रमात ती पुरणार नाही. म्हणून आजपर्यंत अपूर्ण राहिलेले वीस-पंचवीस खोल्यांचे बांधकाम आपण पूर्ण करु.गर्दीच्या पुराचे काही लोंढे लाॅजच्या दारातून आत घेऊ.अगस्ती तृष्णेने त्यांना पिऊन टाकू.अशा अवास्तव महत्वाकांक्षेने शाळेच्या विविध योजनांच्या रकमा भाऊने जुगारावर लावल्यागत पटापट संपवून टाकल्या. शतकमहोत्सवी समाधी संवत्सर आणि सिंहस्थ कुंभमेळा अशा दोन्ही पर्वण्यात वाढलेली गर्दी लक्ष्मीच्या पावलांनी आपल्या मुक्कामी थांबेल. नोटांची रास देऊन,आपल्या गल्ल्याची कणगी भरुन सारे सिंहस्थ मार्गस्थ होतील. त्यांच्या आशीर्वादाने मग सा-या हायजॅक केलेल्या सरकारी रकमा शाळेच्या खात्यात पुनर्जिवित करु.मग सारे ठीक होईल. आलबेल जैसे थे चालू राहील. असे काही भविष्यात्मक तर्क करुन काही हजारो किंवा लक्ष दक्षलक्षांचे आवकी गणित मांडून भाऊने शाळा खाते स्वतःच्या क्रेडिट साठी भांडवल म्हणून डावावर लावले.भविष्यातील नफेखोरीचा तार्किक ताळेबंद डोक्यात मांडून कामाच्या ठिकाणीच आर्थिक भूयार करून खड्डा पाडला.

           त्याच कालावधीत शाळेतल्या वायळ बाईंनी फ्लॅट घ्यायला कर्जाचा प्रस्ताव बॅन्केकडे सादर केला.वार्षिक करभरणा केल्याची पावती त्यांना मिळाली नाही. उलट तुम्ही सरकारचा कर बुडवला. 'तुमच्यावर कारवाई का करु नये ?' याबाबतचा खुलासा मागणारी नोटीस पॅन खात्याच्या स्क्रीनवर हायलाईट झाली. सी.ए.ने तिची प्रिंट बाईंना दिली.बाईंनी ती शाळेत सा-यांना दाखवली.शाळेतली सारीच मंडळी आपापली नोटीस घेऊन सरळ हेडऑफिसला धडकली.चौकशी समिती दुस-या दिवशी शाळेत आली.रकमा हडप झालेल्या होत्याच. त्या सगळ्या आठ दिवसात खात्यावर भरा.त्यासाठीच्या तयारीला लागा.असा दम भरुन आणि टी.ए.डी.ए.चा बंद लिफाफा घेऊन समिती निघून गेली.

     उघड झालेला घोटाळा मिटवायला तो तसा बिलंदर होता.उर्वरित आर्थिक योजना राबवताना फुगवटा-तुटीचे एकतर्फी गणित मांडून त्याने 'करप्रश्न' सोडवलाही असता.पण नेमकी तेव्हाच बदलीची ऑर्डर येऊन धडकली.हेडऑफिसला भाऊचे हेलपाटे वाढले.बदलीच्या समान पिडेने त्रासलेल्या समुहात तोदेखील मिसळला.त्यांच्यासोबत कोर्टाची पायरी चढला. भाऊचा पिंडच मुळी आक्रमक आणि वृत्ती बंडखोर.पण हातून घडलेले प्रताप अटकेपार फडकलेले. यामुळे भाऊ गप्पच राहिला. 'कल्पतरु'चे बांधकाम बंद पडले.मनःस्थिती ढासळली. शरीराचा तोल बिघडला.एके दिवशी ग्राउंड फ्लोअरच्या हौदात भाऊ नळीने पाणी भरत होता. तोल जाऊन त्या दिवशी तो हौदात पडला. बाहेर काढायला तीन चार माणसे धावून आली.त्यांच्या आधाराने त्याला कसेबसे बाहेर येता आले. पण सा-या देहाचा रोबो झाला .पायांची चाल बदलली .छातीच्या हाडाचा अस्थिभंग झाला.कटिबंध आणि पाठ-पोट छाती यांना इलॅस्टीक पॅडींग लागले.खांदे झुकले.'कल्पतरु' लाॅजचे बांधकाम बंद पडले.सिंहस्थ पर्व जवळ आले.शाही स्नाना साठी जाणा-यांची, किंवा ते करुण आलेल्यांची सशुल्क सेवा भाऊच्या नशिबी नव्हती. कोणीतरी मजेने त्यालाच स्नानासाठी जायची आवश्यकता पटविली. त्याला अनुकूल असणा-यांची एक स्वतंत्र फळी संस्थेत आणि शाळेत होतीच. त्या 'डी' कंपूसह नदीच्या काठी उथळ कुंडात भाऊ अभिषिक्त झाला. कमरे इतक्या पाण्यात पोटाने वर्तुळे काढत भाऊ नदीत गरगर फिरला.पाण्यात देहाचा भार हलका होतो.बेभान होऊन कुंडात रिंगण धरले.गिरक्या घेतल्या. अदृश्य दंडुकेधारी बाबा समोर डोळे झाकून कान पकडले. दोन्ही हातांची कैची बनवत स्वतःच्या श्रीमुखात हाणून घेतले.बोंबा ठोकत डुबक्या मारल्या.त्याचा जिवलग जिवाचा सखा रेवजी पुन्हा कुंडात उतरला.स्वतः ओला झाला.भाऊच्या जवळ गेला.रेवजीला भाऊने मिठी मारली. "आता बास कर.सगळं काही नीट होईल." असे म्हणत रेवजीने त्याला काठावर आणले.

परवा सहज पेपर चाळताना एक पॅम्प्लेट खाली पडले.पेपरातील असे कोणतेही पॅम्प्लेट मी वाचल्याशिवाय रद्दीत टाकत नाही. या सवयीप्रमाणे ते वाचून काढले. 'कल्पतरु' जलसेवा

ही हेडींगची अक्षरे मला परिचयाची वाटली.त्यातल्या 'जलसेवा' शब्दाच्या ठिकाणी 'लाॅज' हा शब्द असावा असे मला वाटले.मी लगेच दीपराज सरांना फोन करुन

 ' कल्पतरु जलसेवा ' या फर्मबद्दल विचारले.तेव्हा त्यांंच्याकडून कळले की भाऊने लाॅज बांधण्यासाठी स्लॅपचे जे स्ट्रक्चर उभे केले होते त्यात भिंती न घालता आरोप्लांट टाकला आहे.त्या व्यवसायात त्याला चांगला सूर ही सापडला आहे.त्याचे आता चांगले चालू आहे.  

     यावर मी त्याला म्हटले की,सर्वस्व गमावलेल्या मरणासन्न पक्षाची राखेतून उडून भरारी घेण्याची गोष्ट ऐकली होती. पण तसा फिनिक्स पक्षी प्रत्यक्षात आपल्या अवतीभवती देखील विहार करतो आहे. हे ऐकून किंवा उद्या त्याला प्रत्यक्ष पाहून आश्चर्य वाटू नये. त्यावर तो जे म्हटला ते ऐकून मी जास्त विचारात पडलो.तो म्हणाला, "पण हा दुस-यांंना जाळून,त्यांची राख करुन त्या राखेतून मुसंडी मारतो."

        मी त्याला विचारले, " असे का म्हणतो आहेस ?" त्यावर त्याने सांगितले की,पदर खर्चाने कामगार आणून मी भाऊच्या लॉजचे स्ट्रक्चर उभे केले. त्या मोबदल्यात कामगारांना द्यावयाचा पगार त्याने नाकबूल केला.कामगार माझे असल्याने मीच तो देऊन टाकला. बायकोचे मंगळसूत्र मोडून.

      माझी आता खात्री झाली:भाऊ खरोखरच फिनिक्स आहे;पण मी म्हणतो तसा नाही.दीपराज म्हणतो तसा !

 ' दुस-याची राख करून त्या राखेतून मुसंडी मारणारा ! '

देशी फिनिक्स

                                            सुरेश भिंगारदिवे,राहाता





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

 सर्वांना सप्रेम नमस्कार🙏2015 सालातील हिरोशिमादिनी मित्र परिवारात साजऱ्या झालेल्या माझ्या वाढदिवशी माझ्यातल्या अभयी बालवृत्तीला पाहून माझ्य...