कुठे कामाला होता?........ आता रिटायर्ड असाल ; हो ना?... रिटायर्डमेंटला अजून किती वर्षे बाकी आहेत? असा दर्प असलेला प्रश्नांचा भडीमार कुठल्या ना कुठल्या अस्थापनेतील, सेवाक्षेत्रातील पुष्कळ अभाग्यांना येत असतो. आपण स्वतः देखील तशा मावळतीच्या रंगांनी भरलेले प्रश्न ; चिरतरुणतेचा आजन्म वर भेटल्याच्या अविर्भावात इतरांना विचारत असतो. तसल्या भारवाही दिसणाऱ्या अतिपोक्त, जख्खड अभाग्यांना तसे दिसण्याच्या गुन्ह्याबद्दल शिक्षा मिळायलाच हवी. असो.
हे सर्व वयाधारित तर्क आडाखे काहींबाबत व्यक्त करणे कठीण असते. अथवा कुणाला रिटायर्ड घोषित करणे अथवा मानने जिकिरीचे ठरते. अशा काही व्यक्तीरेखा उत्फुल्लपणे आपल्या कर्तृत्व कर्तबगारीच्या शील्पांनी दिलेला प्रांत अभेद्य बनवतात. जिथे जिथे त्या व्यक्ती कार्यरत राहतात त्या प्रत्येक प्रांत, कार्यक्षेत्राला देदिप्यमान करण्याची कष्टप्रद कलाकुसर आणि कुशलता समर्पित होऊन सत्कारणी लावतात.
ज्या धुरिणांना असे कार्यसंचित लाभले ते धन्य. अशा कार्यधुरिणांच्या मांदियाळीत पी.जे.एस.एस शाळेचे मुख्याध्यापक सन्मा. भाऊसाहेब साळवे सर यांचे नाव त्यांच्या कार्यमुद्रेने अढळांच्या अक्षरसूचीत आपणांस पाहावयास मिळत आहे. स्वातंत्र्योत्तर काळातील तत्कालीन अहमदनगर व सांप्रत अहिल्यानगर जिल्ह्याच्या शैक्षणिक वाटचालीत पुणे डायसेस च्या प्रजाजागृती संस्थेने जे विधायक व राष्ट्रनिर्माणक कार्य केले आहे त्याचा भव्य ऊहापोह व जमाखर्च मांडताना अथवा अभ्यासताना तेअनुभवांस येते.फक्त राहाता येथीलच नाही तर संपूर्ण जिल्ह्यातील पी.जे.एस.एस संस्थेच्या आजीमाजी मुख्याध्यापकांच्या नामसूचीचे अवलोकन करताना त्या सर्व मुख्याध्यापकांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील या ऐतिहासिक पण वर्तमानात कार्यरत असलेल्या संस्थेचा हा भव्यदिव्य प्रगतालेख उंचावलेला आहे. तो पाहून ही प्रचिती येते. यात अतिशयोक्त असे काहीही नसल्याच्या वस्तुस्थितीची शाश्वती मिळते. मन कृतज्ञतेच्या भावनांनी विनम्र होते.
मिळालेला समृद्ध वारसा, हीतकारक तत्वे, परंपरा, मूल्ये संवर्धित करण्यासाठी संस्थेतील प्रशासक, व्यवस्थापक, मुख्याध्यापक ,शिक्षक संपूर्ण कार्यक्षमतेने पीजेएसएस संस्थेत आपला कार्यभार सांभाळत आहेत. मुख्याध्यापक श्री.भाऊसाहेब साळवे यांचा अडतीस वर्षांचा कार्यकाल लवकरच पूर्ण होतो आहे. त्यांचा मूळ पिंड हा शिक्षकाचा आहे. शिक्षक म्हणून त्यांनी राहाता, केंदळ , सोनगाव,कोळपेवाडी आदि ठिकाणी सेवा दिलेली आहे. अडतीस वर्षे इतका मोठा परिप्रेक्ष्य सेवाकाळात मिळणे ही बाब सद्यस्थितीत तशी दुर्लभ ठरू शकते. सरांना ही सुसंधी मिळाली. त्यांच्यावर विश्वास दर्शवून 'मुख्याध्यापक' पदाचे कार्यअलंकारी आभूषण संस्थेने त्यांना बहाल केले. ते त्यांनी विश्वास पूर्वक जपले. त्या पदाच्या जबाबदाऱ्या सक्षमतेने पार पाडून त्या पदाला त्यांनी उचित न्याय दिला. या पदाचा शिरपेच बहुतांना मुकूट वाटतो. हे खरे देखील आहे पण हा मुकूट मुलतः रत्नजडीत नसून कंटकांकीत असतो. त्या पदाला सांभाळणाऱ्याची कार्यकुशलता, सक्षमता पाहून फलस्वरूप रत्नसन्मानांचा सांभार मुख्याध्यापक पदाला तदनंतर बहुमान म्हणून मिळत जातो.साळवे सरांना तो मिळाला.राहाता येथील शाळेचा कार्यभार सांभाळल्या पासून त्यांनी अनेक चांगल्या सुधारणा येथील शाळेत व शाळेच्या प्रांगणात घडवून आणल्या. वृक्षारोपण केलेल्या झाडांना जबाबदारीने पाणी देण्याची त्यांची संवेदनशीलता आम्ही पाहिली आहे. विद्यार्थीकेंद्री, विद्यार्थीस्नेही, संस्थाभिमुख, शिक्षकऐक्यानुकूल कार्यशैलीने या शाळेचा अंतर्बाह्य कायापालट त्यांनी घडवून आणला. प्रशासन, शिक्षक आणि समाज यांच्यातील सामर्थ्यशाली दुवा म्हणून मुख्याध्यापकाचे स्थान महत्वपूर्ण मानल्या जाते. तसा समन्वय आणि दुवा राखण्याची नेतृत्वशीलता साळवे सरांना पूर्णांशाने इथे राखता आली. त्यासाठी त्यांना अधिकचा वेळ देण्याची, अधिकची कष्टप्रदता सोसण्याची सोशिकता बाळगावी लागली. या बाबीची जाणीव या संस्थेच्या प्रशासक, व्यवस्थापक, शिक्षक, पालकांना निश्चितपणे आहे.
शिक्षक होणे म्हणजे विद्यार्थ्यांतील ज्ञानसंक्रमणाचा, त्यांना शिकवून, साक्षर-संस्कारित करण्याचा व्यवसाय स्वीकारणे एवढेच अभिप्रेत नाही. तर विद्यार्थी विकासासाठी देवाचे शिक्षणक्षेत्रातील आमंत्रण स्वीकारणे होय. त्याअर्थाने शिक्षक होणे खूप महत्वाचे आहे. "तुम्हीं या सर्व गोष्टी करू शकत नसाल तर शिक्षक होऊ नका". असा कटू पण सत्याधिष्ठीत आदेश 'बायबल' या पवित्र ग्रंथातूनही दिलेला आहे. अधिकारी हे देवाने नेमलेले आहेत. असा उल्लेखही बायबल ग्रंथातून आल्याचे आपणांस माहीत आहे. त्यामुळे त्या-त्या क्षेत्रातील प्रगती अथवा अधोगतीस अधिकारी जबाबदार असल्याचे मानल्या जाते.
खऱ्या अर्थाने राबणारा, कर्तुत्व करणारा कामगार असतो. पण या कामगारांना प्रेरित आणि कार्यप्रवण करणारा अधिकारी कोणत्याही व्यवस्थेत महत्वाचा मानल्या जातो. शिक्षणासारखे पवित्र क्षेत्र निर्जीव उत्पादनक्षमतेशी निगडीत नसून जिवंत मन असलेल्या विद्यार्थ्यांशी संबंधित आहे. नागरिक घडवण्याचे, विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देण्याचे, जगात सुखस्थैर्य मिळवून देण्याचे कार्य शिक्षकांस करावे लागते. त्यादृष्टीने संस्था,शाळा, पालक, परिसर यानुषंगाने अनुकूलता निर्माण करण्याचे, शिक्षकांना कार्यप्रेरित करण्याची महत्वपूर्ण जबाबदारी मुख्याध्यापकांस पारपाडावी लागते. राहाता येथील पी.जे.एस.एस शाळेचा, येथील शिक्षक विद्यार्थ्यांचा नावलौकिक सर्वश्रूत आणि निर्विवाद आहे. आजतागायत तो टिकून आहे. यामागे संस्थेच्या शिक्षकांचे योगदान नक्कीच आहे. पण या सर्व यशस्वी वाटचालीच्या घोडदौडीसाठी अनुकूत रस्ता, संसाधने, निर्माण करण्याची,समस्या निराकरणाची दूरदर्शी नियोजनशीलता मुख्याध्यापकाठायी असली तरच शाळेतील शिक्षक चांगले कार्य करू शकतो. या शाळेतील उत्साही, विद्यार्थीप्रिय, विद्यार्थीस्नेही, तत्वदर्शी, विद्यार्थीहितैषी शिक्षकवृंदांमागे आजपर्यंत आपले साळवेसर भक्कम बुरुजासारखे पाठीराखे झाले. समोर आलेल्या संकटात ढाल झाले. शेवटी शिक्षक हा देखील माणूसच आहे. संकटे, दुःखे, व्याधी यांचे चढउतार त्यांच्याही आयुष्यात येणारच. येथील शिक्षक बांधवांच्या अडीअडचणी, आजारपण, वगैरे तत्सम समस्यात त्यांच्यासाठी ते कृतीशील समुपदेशक बनले. शिक्षणशास्त्र, बालमानसशास्त्रज्ञ व शिक्षणतज्ज्ञ यांनी आदर्श मुख्याध्यापकांमध्ये जी मार्गदर्शक तत्वे, गुणवैशिष्ट्ये अपेक्षिलेली आहे त्या सर्वांचे संगठण सन्मा. भाऊसाहेब साळवे यांच्यात असल्याचे आपण पाहत आलेलो आहे.
परदेशातून भारतात आलेल्या परदेशीय मिशनरींनी येथील नागरिकात सर्वप्रथम शिक्षणाचा प्रसार केला. शिक्षण हा मानवाचा तिसरा डोळा आहे.बऱ्या वाईटांची योग्य निवड करण्याची दृष्टी शिक्षण देते. परदेशीय नागरिकांचा सेवाभाव एतद्देशीय मिशनरींनी आदर्श मानून स्थापन केलेल्या शाळेतून तो अवलंबला. पी.जे.एस.एस शाळा ज्या संस्थेअंतर्गत स्थापन झाली त्या संस्थेच्या आदर्शांशी, तत्वांशी सुसंगत अशी मूल्याधारित कार्यप्रणाली शालेय कामकाजात प्रतिबिंबित व्हावी, संस्थेचा नावलौकिक वाढावा म्हणून मुख्याध्यापक या नात्याने श्री भाऊसाहेब साळवे सदैव प्रयत्नशील राहिले आहेत.
मी सोनगाव येथे राहत असताना साळवेसर लोणी येथून सोनगावला शाळेत येत. तिथे ते सहशिक्षक म्हणून कार्यरत होते. मी वाकडी येथे त्यावेळी शाळेत कार्यरत होतो. रस्त्याने येता जाता दररोज आमची भेट होई. शालेय कामकाजाच्या खूप अगोदर ते शाळेत जात. पुढे मुख्याध्यापक म्हणून राहाता येथे रुजू झाल्यानंतर शालेयकामी ते तितक्याच लवकर शाळेत येत असल्याचे मी पाहिले आहे. लोणी-प्रवरानगर येथील चर्च परिवारात ते नेहमीच कार्यरत असतात. सभा कार्यक्रमातून त्यांचे बोलणे ऐकताना त्यांच्या वाचनाधिष्ठीत विचारीपणाचा प्रत्यय येतो. शाळेतील शिक्षक-विद्यार्थ्यांच्या लेखनातील शुद्धतेचा ते आग्रह धरतात.व्यक्तीच्या दर्शनीय व्यक्तीमत्वात देखील त्या व्यक्तीचे कर्तृत्व प्रतिबिंबित झाल्याचा प्रत्यय येत असतो. आपण आपले बाह्य व्यक्तिमत्वही जपायलाच हवे. आपला नीटनेटकेपणा आपण जिथे जाऊ तिथे प्रभाव टाकत असतो. ती व्यक्तिमत्वाची देण साळवे सरांना लाभलेली तर आहेच पण ती व्यक्तिमत्वाची देण नीटनेटकेपणाने जपून ठेवण्याची योजकताही त्यांच्यात आहे. कार्यकुशल प्रशासनाच्या संचलनाचे कसब त्यांच्यात आहे.याच बळ सामर्थ्यांच्या संचित शिदोरी ने संस्थेच्या प्रमुख-मुख्याध्यापक पदाला त्यांनी प्रतिष्ठा मिळवून दिली.
असे असले तरी कर्तव्य कठोर असते. कर्तव्यातील अशा एखादया कालखंडात प्रस्थापित व्यवस्था सेवकाला मग तो कर्मचारी असो वा अधिकारी त्याला व्यवहारी बनवते. रोजगाराच्या ठिकाणी सर्वस्व पणाला लावण्याचा कटू काळ अंतर्यामीच्या भावनांना गोठवून टाकतो. कुटुंबियांकडे दुर्लक्ष होण्याला, दुर्लक्ष करण्याला भाग पाडतो.
मे महिन्याच्या एकतीस तारखेला सर निवृत्त होत आहेत. याप्रसंगी त्यांच्या मातोश्री उपस्थित राहतील. आपल्या सुपुत्राची सेवाकाल तपपूर्ती कृतार्थ मनाने, त्रिकालातीत मातृदृष्टीने पाहतील. संतृप्त होतील. अशी मनोकामना साळवे सरांना नक्कीच वाटत असणार ! मुलाच्या निवृत्तीनंतर त्याच्या अधिकाधिक सहवासात आपण राहू शकू अशी भविष्यवेधी मनिषा त्या आईनेही मनात बाळगलेलीच असणार!
पण त्यापूर्वीच अवघ्या काही दिवसांपूर्वी त्या मातेला हा सोहळा अनुभवण्याविना इहलोक सोडून जावे लागले. सरांच्या या शल्याची टोचणी आपण समजू शकतो.
सरांच्या सहचारिणी आदरणीय मंगलमॅडम यांचा मी विद्यार्थी आहे. माझ्या बाल्यावस्थेत एकोणचाळीस वर्षांपूर्वी सहाव्या इयत्तेत इंग्रजी विषयाचे अध्यापन त्यांनी आम्हांल केले आहे. त्यांनी आम्हांला जसे शिकवले तशी अध्यापनशैली, शिक्षणविषयकसमर्पनशीलता, आम्हा शिक्षक झालेल्या विद्यार्थ्यांत पूर्णांशाने येण्यायोग्य पात्रता निदान माझ्यात तरी नाही. हे मी सविनय कबूल करतो. म्हणून माझ्या आदरस्थानी असलेल्या , ज्यांना मी मनोमन वंदन करतो अशा आदर्श शिक्षकांपैकी आदरणीय मंगल मॅडम या माझ्या आदर्श आहेत. गुरुमाता आहेत. त्यांनी दिलेल्या विद्येच्या कल्याणकारी पाठांना प्रेरणा, प्रमाण, पूज्य मानून माझी वाटचाल चालू आहे. गुरुऋण हे न फिटणारे असते. पण साळवेसर यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमाच्या निमित्ताने माझ्या गुरुमातेविषयक व्यक्त केलेली कृतज्ञता ओघानेच साळवे सर यांच्यासाठीही आहे. म्हणूनच साळवेसर यांच्या सेवानिवृत्ती नंतरच्या नवीन पर्वासाठीच्या शुभेच्छा माझ्या बाल्यावस्थेतील शिक्षिका आदरणीय मंगल मॅडम यांनाही देतो.
आयुष्यात उभे राहण्यासाठी ज्यांच्या आशीर्वादांची पाखर मला लाभली त्यापैकी एक असणाऱ्या साळवे कुटुंबियांचे ऋण मानण्यात मला धन्यता वाटते.
निवृत्तीनंतरच्या सुखपूर्ण,आरोग्यदायी, श्रांत-कृतार्थ, निश्चिंत दिनक्रमासाठी खूप साऱ्या शुभेच्छां त्यांच्या सोबतीला असो.
सुरेश दगडू भिंगारदिवे, राहाता.